मध्य प्रदेशातून रॉकेलची सर्रास तस्करी
By Admin | Updated: October 29, 2014 22:44 IST2014-10-29T22:44:10+5:302014-10-29T22:44:10+5:30
मागील अनेक महिन्यापासून गोबरवाही तथा तुमसर परिसरात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात रॉकेलची तस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावरील

मध्य प्रदेशातून रॉकेलची सर्रास तस्करी
तुमसर : मागील अनेक महिन्यापासून गोबरवाही तथा तुमसर परिसरात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात रॉकेलची तस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावरील सीमा सताड उघडल्या असल्याने या तस्करांचे फावत आहे.
राज्य शासनाने रॉकेलचा पुरवठा कमी केल्यानेच महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळीने राूकेलची तस्करी सुरू केली आहे. सीमेकडील मध्यप्रदेशातील अनेक लहान गावातील नागरिकांकडून ही टोळी अत्यल्प किंमतीस रॉकेल खरेदी करणे तसेच स्थानिक दुकानदारांकडूनही रॉकेल खरेदी करून ते रॉकेल नाकाडोंगरी मार्गे गोबरवाही व तमसरात आणले जात आहे. तुमसर-नाकाडोंगरी, तुमसर-बपेरा, तुमसर-रामटेक, तुमसर-तिरोडा या मार्गावर धावणाऱ्या तीनचाकी व चारचाकी वाहनात सर्रास रॉकेलचा वापर केला जातो. ट्रॅक्टर व डिझेल इंजिनमध्ये सुद्धा सर्रास रॉकेलचा उपयोग सुरू आहे.
तुमसर तालुक्यात काळ्याबाजारातील रॉकेलची किंमत अधिक आहे. पुरवठा कमी असल्याने तो सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे तस्करांनी मध्यप्रदेशातून रॉकेलची तस्करीकडे आपला मोर्चा वळविला आहे.
दुधाच्या प्लॉस्टीक डब्यातून, टीनाचे डब्बे, आॅईलच्या डब्यातून हा रॉकेल आणला जातो. चारचाकी वाहनातून रॉकेलची खेप मध्यरात्री व पहाटे येथे पोहचते, अशी माहिती आहे. वाहनात व हॉटेलात रॉकेलचा वापर करणारे ग्राहक रात्रीच घटनास्थळी गोळा होेवून रॉकेलची खरेदी करतात. नगदी व धोकारहीत व्यवसाय म्हणून तस्करांनी आपला मोर्चा या व्यवसायाकडे वळविला आहे.
सर्वसामान्य जनतेला या तस्करीची माहिती निश्चितच आहे. परंतु टोळीने व्यवसाय करणाऱ्याच्या विरोधात कुणी समोर येत नाही. गावातील प्रतिष्ठीत नागरिकही मूग गिळून गप्प आहेत. काही ठिकाणी या तस्करांचे रिटेलर सुद्धा आहेत, अशी माहिती आहे. अन्न पूरवठा विभागाने आतापर्यंत येथे धडक दिली नसून कधीच कारवाई केल्याचे ऐकीवात नाही. (तालुका प्रतिनिधी)