अवकाळी पावसाने रबी पिकाला फटका

By Admin | Updated: March 2, 2015 00:44 IST2015-03-02T00:44:11+5:302015-03-02T00:44:11+5:30

रविवारी दुपारनंतर अवकाळी मुसळधार पावसामुळे आंबा मोहराला फटका बसला. यामुळे कापणीला आलेले व कापणी झालेले रबी पीक पूर्णत: धोक्यात आले आहे.

Rare Crop hit by unseasonal rains | अवकाळी पावसाने रबी पिकाला फटका

अवकाळी पावसाने रबी पिकाला फटका

भंडारा : रविवारी दुपारनंतर अवकाळी मुसळधार पावसामुळे आंबा मोहराला फटका बसला. यामुळे कापणीला आलेले व कापणी झालेले रबी पीक पूर्णत: धोक्यात आले आहे. पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेकडो क्विंटल शेतमाल भिजला. तो उचलण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. आवश्यकता असताना पावसाने दडी मारली होती. यामुळे खरीप पिके धोक्यात आल्याने धानपीके करपली होती. त्यामुळे शेकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून शेतकऱ्यांनी स्वत:ला सावरत रबी पिकांच्या माध्यमातून कर्जाचा बोझा कमी करण्याच्या तयारीत होते. शेतकरी अशा अपेक्षेत असतानाच शनिवारपासून ढगाळ वातावरण आहे. रात्री काही प्रमाणात तुरळक पाऊस पडला. रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील कापणीला आलेला व डौलात उभा असलेला गहू पूर्णत: जमीनीवर लोळला.
शनिवारीपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर तुरळक पावसाने सुरूवात केली. मध्यरात्री जिल्ह्यात पाऊस बरसला. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दुपारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी ४ वाजातच्या सुमारास जोरदार पावसाने सुरूवात केली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पडला. अवकाळी पावसामुळे धान पिकांना वगळून रब्बीचे चना, गहू, तूर, वटाणा, निंबू, कांदा, लाखोळी, टरबूज व कळधान्यासह भाजीपाल्यालाही जबर फटका बसला. काही ठिकाणी गहू भूईसपाट झाल्याचे चित्र आहे. सुमारे तासभर बरसलेल्या पावसामुळे उभ्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. कापणी झालेल्या हरभरा व तुरीच्या शेतात लावलेल्या गंजा अवकाळी पावसाने भिजल्या. आधिच जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास पळविला.
याशिवाय बहरलेल्या आंब्याचा मोहर गळून पडला आहे. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
अकाली पावसामुळे वातावरणात बदल झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. वृत्त लिहिपर्यंत पाऊस सुरू होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rare Crop hit by unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.