वनतस्करांना ‘रान’मोकळे
By Admin | Updated: September 1, 2014 23:20 IST2014-09-01T23:20:17+5:302014-09-01T23:20:17+5:30
वनपाल व वनरक्षकांचा आठ दिवसांपासून संप सुरू आहे. याचा फायदा वनतस्करांनी उचलला असून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू केली आहे. आंतरराज्यीय सिमेवर असलेल्या नाकाडोंगरी

वनतस्करांना ‘रान’मोकळे
फटका संपाचा : नाक्यावरची तपासणी झाली बंद, अधिकाऱ्यांअभावी सोडली जातात वाहने
प्रशांत देसाई - भंडारा
वनपाल व वनरक्षकांचा आठ दिवसांपासून संप सुरू आहे. याचा फायदा वनतस्करांनी उचलला असून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू केली आहे. आंतरराज्यीय सिमेवर असलेल्या नाकाडोंगरी व बफेरा या वन नाक्यांसह जिल्ह्यांतर्गत आठ वन नाक्यांवरून मोठ्या प्रमाणात वनतस्करी सुरू झाल्याची माहिती आहे.
भंडारा हा जंगलव्याप्त जिल्हा असून या जिल्ह्यात गोंदिया व लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगढच्या सिमा लागून आहेत. वनसंपदेने नटलेला भंडारा जिल्हा हा वनतस्करीसाठी संवेदनशिल आहे. वन विभागांतर्गत आंतरराज्यीय सिमेवरील व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नाकाडोंगरी व बफेरा येथे वनविभागाचे वन उपज नाके आहेत. या नाक्यांवरून नेहमी अवैध वाहतूक होत असल्याचे बोलले जाते. या नाक्यांतर्गत वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोहफुलांचा व्यवसाय चालतो. सध्या अधिकारी संपावर असल्याने या नाक्यांवर वरिष्ठ अधिकारी नसल्याने नाका सांभाळण्याची जबाबदारी वनमजुरांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या नाक्यांवरून मोठ्या प्रमाणात वनतस्करी सुरू असल्याचे संपावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्यप्रदेशात मोहफुलाच्या दारूवर निर्बंध नाही. त्यामुळे या परिसरातून मोहफुलाची चोरीच्या मार्गाने वाहतुक होत होती. संपामुळे नाके अधिकाऱ्यांविना असल्याने व कर्तव्यावरील वनमजुरांना अधिकार नसल्याने ते वाहतुक होत असलेल्या वाहनांची तपासणी न करता सोडून देत आहे. मात्र या वाहनांमधून मोहफुल आता भंडारा शहरात येत असल्याची गुप्त माहिती पुढे आली आहे. वन नाक्यांवर वाहनांची तपासणी होत नसल्याने सदर वाहने राजरोसपणे रस्त्यांवरून धावत आहेत. भंडारा येथून गांधीधाम, गुजरात, नाशिक, कलकत्ता, रायपुर, पुणे, आंध्रप्रदेशकडे वाहतूक होते. वनाधिकाऱ्यांच्या संपामुळे वनतस्करांकडे कुणाचेही लक्ष नाही. आंतरराज्यीय सिमेवरील नाक्यांसह जिल्ह्यांतर्गत नाक्यावरही हीच परिस्थिती आहे. वनविभागांतर्गत जिल्ह्यात कारधा, गिरोला, कालागोटा, चिचोली, जांब-कांदरी, मंगर्ली, निलज व पवनी येथे भंडारा वनविभागाचे वन उपज तपासणी नाका आहेत. या आठही ठिकाणच्या नाक्यांवर वनरक्षक व वनमजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र संपामुळे वनरक्षक सध्या कर्तव्यावर नाहीत. त्यामुळे ही नाके वनविभागात नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना बंद वाहन तपासणीचे अधिकार नाहीत. त्यामुळे किंवा स्वत:च्या जिवाची चिंता असल्याने वाहनचालकांच्या धाकाने हे कर्मचारी नाक्यावर वाहनांची तपासणी करण्याचे टाळत आहेत.
बाहेर राज्यातून किंवा अन्य ठिकाणाहून आलेल्या वाहनांची नाक्यावर तपासणी करताना आवश्यक असलेल्या वनकायद्याची पूर्ण माहिती नसल्याने वाहने सोडली जात आहेत. या नाक्यांवर वनमजुरांची नेमणूक करण्यात आली असल्याने काही वाहनधारक चिरीमिरी देऊन निघून जात असल्याचेही बोलले जात आहे. जबाबदार अधिकारी नसल्याने वनमजुरांना आठ तासांचे कर्तव्य बारा तास करावे लागत आहे.