शेततळ्यातील पाण्यातून केली रोवणी
By Admin | Updated: November 5, 2015 00:38 IST2015-11-05T00:38:01+5:302015-11-05T00:38:01+5:30
मान्सूनला उशिरा सुरुवात झाल्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली. रोवणीची वेळ आली तरी पावसाचा पत्ता नव्हता.

शेततळ्यातील पाण्यातून केली रोवणी
लोकमत शुभवर्तमान : जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रुती
भंडारा : मान्सूनला उशिरा सुरुवात झाल्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली. रोवणीची वेळ आली तरी पावसाचा पत्ता नव्हता. अशावेळी जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या आणि पहिल्याच पावसाने भरलेल्या शेततळयातील पाणी कामी आले. तळयातील पाण्याचा उपयोग करून रोवणी तर केलीच पण पाण्यामुळे माझे पीक वाचले व दुबार रोवणीची वेळ आली नाही, अशी प्रतिक्रिया सितासावंगी येथील सोमा गाढवे या शेतकऱ्याने व्यक्त केली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या सितासावंगी या गावातील शेतकरी पूर्णत: पावसाच्या पाण्यावर शेती करतात. भंडारा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्यामुळे धान हे मुख्य पीक आहे. मात्र पावसाच्या अनियमितपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांना भाताचे पिक घेणेही शक्य होत नाही. या गावातील सोमा गाढवे यांची दोन एकर शेती आहे. कोरडवाहू शेती असल्यामुळे भात व तुर हे पिक ते घेतात. मात्र एखाद्यावर्षी पाऊस ऊशिरा आला किंवा कमी झाला तर भाताचे पिक हातून जात असल्याचे गाढवे यांनी सांगितले.
यावर्षी गाढवे यांच्या शेतात जलयुक्त शिवार योजनेमधून २५ बाय २० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे करण्यात आले. पहिल्याच पावसात शेततळे भरले. पावसाला सुरूवात झाल्यामुळे गाढवे यांनी भात नर्सरी तयार केली. मात्र पावसाने महिनाभर दडी मारली. पावसाअभावी परिसरातील शेतकऱ्यांची नर्सरी करपत असताना गाढवे यांनी शेततळ्यातील पाण्यावर नर्सरी वाचवली आणि पाण्याचा उपयोग चिखलणीसाठी करून धानाची रोवणी केली. याशिवाय ज्या-ज्यावेळी पिकाला पाण्याची गरज होती आणि पाऊस आला नाही त्या प्रत्येक वेळी शेततळ्यातील पाणी देऊन त्यांना पीक वाचवता आले.
शेततळ्यामुळे एका पाण्याअभावी पीक जाण्याची भिती आता राहिली नाही. या शेततळयात उन्हाळ्यापर्यंत पाणी राहिले तर, यावर्षी भाजीपाला लागवड करण्याचा मानस गाढवे यांनी व्यक्त केला. शासनाने प्रत्येकाच्या शेतात असे शेततळे करून द्यावे, अशी मागणीही गाढवे यांनी यावेळी केली. (जिल्हा प्रतिनिधी)