दुग्ध संघाच्या अध्यक्षपदी रामलाल चौधरी
By Admin | Updated: July 10, 2016 00:29 IST2016-07-10T00:29:15+5:302016-07-10T00:29:15+5:30
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदासाठी आज शनिवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली.

दुग्ध संघाच्या अध्यक्षपदी रामलाल चौधरी
चौधरी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : नाट्यमय घडामोडी, बैठकांचे सत्र
भंडारा : भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदासाठी आज शनिवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत संघाच्या अध्यक्षपदी रामलाल चौधरी यांची अविरोध निवड करण्यात आली. तत्पुर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडीत रामलाल चौधरी यांनी काँगे्रस पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले.
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघावर विराजमान असलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने २६ जून रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सात संचालक अविरोध निवडूण आले तर पाच संचालकांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली.
निवडणुकीचा निकाल जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या गटाच्या बाजुने येत या गटाचे ७ संचालक निवडून आले. या प्रक्रियेनंतर जिल्हा वासीयांच्या नजरा अध्यक्षपदाकडे लागल्या होत्या. विलास काटेखाये, नरेश धुर्वे, सदाशिव वलथरे, विनायक बुरडे आदींची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. या चर्चांना आज पुर्णविराम देत रामलाल चौधरी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ अविरोध पडली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, दुग्ध संघाचे मावळते अध्यक्ष विलास काटेखाये, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, नरेश माहेश्वरी, जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर सपाटे, नरेंद्र बुरडे, धनराज साठवणे तसेच संघाचे नवनियुक्त संचालक विनायक बुरडे, महेंद्र गडकरी, नरेश धुर्वे, आशिष पातरे, सदाशिव वलथरे, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवनकर, राम गाजीमवार, रिता हलमारे, अनिता साठवणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)