भंडाऱ्यात रामचंद्र अवसरे यांनी मारली बाजी
By Admin | Updated: October 19, 2014 23:17 IST2014-10-19T23:17:03+5:302014-10-19T23:17:03+5:30
एकेकाळच्या काँग्रेसचा बालेकिल्ला व त्यावनंतर शिवसेनेचा भगवा फडकलेल्या भंडारा जिल्ह्यात भाजपने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खिंडार पाडले आहे. जिलञह्यातील तिन्ही विधानसभेच्या

भंडाऱ्यात रामचंद्र अवसरे यांनी मारली बाजी
भंडारा : एकेकाळच्या काँग्रेसचा बालेकिल्ला व त्यावनंतर शिवसेनेचा भगवा फडकलेल्या भंडारा जिल्ह्यात भाजपने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खिंडार पाडले आहे. जिलञह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागांवर भाजपने कब्जा केला आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रातून अॅड. रामचंद्र अवसरे यांनी दणदणीत मते घेऊन विजय संपादन केला. परिणामी विजयी झालेल्या खेम्यात आनंदाची लाट तर दुसरीकडे पराभवाचे दु:ख चेहऱ्यावर झळकत होते. रामचंद्र अवसरे हे ३६ हजार ७३२ मतांनी विजयी झाले.
सकाळी ८ वाजतापासून भंडारा शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या पोलीस बहुउद्देशिय सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. भंडारा विधानसभेचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. संपत खिल्लारी यांच्यासह निवडणुक निरीक्षक मोहनलाल व वरिष्ठ निवडणुक अधिकारी मंचावर उपस्थित होते.
राऊंडनिहाय मतमोजणीची घोषणा करण्यात येत होती. पहिल्या राऊंडपासुनच भाजपचे अॅड. रामचंद्र अवसरे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या प्रत्येक राऊंडला त्याच्या मतमोजणीचा आलेख अन्य उमेदवारांच्या तुलनेत वाढत जात होता. निवडणुक अधिकारी मतमोजणीची घोषणा करताच बाहेर उपस्थित भाजप कार्यकर्ते एकच जल्लोष करीत होते. २३ पैकी बहुतांश राऊंड आटोपल्यावर अॅड. अवसरे यांना मिळालेल्या मतांचा टप्पा फार मोठ्या अंतराचा असल्याने ते हमखास निवडून येतील याचा पक्का अंदाज बांधून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरूवात केली. दुसरीकडे बसपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावरत हळूहळू नैराश्य पसरत असल्याचे जाणवले. निवडणुकीत जय-पराजय होईलच ही बाब नक्की असतेच. आणि त्यामुळेच मतदान परिसरात कुठे खुशी तर कुठे गमचा माहोल दिसून आला.
दि. १५ आॅक्टोबर रोजी मतदान झाले होते. भंडारा विधानसभा क्षेत्रात भंडारा आणि पवनी तालुक्याचा समावेश होतो. या विधानसभा क्षेत्रात तीन लक्ष ४१ हजार १९८ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या १ लक्ष ७२ हजार ४८६ तर महिला मतदारांची संख्या १ लक्ष ६७ हजार ५७५ इतकी आहे.
यापैकी २ लक्ष ३२ हजार २९४ मते वैध ठरली. १६२१ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. भंडारा विधानसभा क्षेत्रात एकूण मतदान २ लक्ष ३३ हजार ९१५ इतके झाले. या निवडणुकीत भाजपचे अवसरे यांना ८३ हजार ४०८ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर बसपाच्या देवांगणा गाढवे राहिल्या. त्यांना ४६ हजार ६७६ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर राहिले. त्यांना ४२ हजार ७६६ मते प्राप्त झाली. चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे युवराज वासनिक तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सच्चिदानंद फुलेकर राहिले. दोघांना अनुक्रमे ३० हजार ६५५ व १५ हजार २४३ मते मिळाली. या विधानसभा क्षेत्रातून एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अकरा उमेदवारांना तीन आकडीच मते मिळाली. चार उमेदवारांना चार आकड्यांचा पल्ला गाठता आला. रामचंद्र अवसरे हे ३६ हजार ७३२ मतांनी विजयी झाले. रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भंडारा विधानसभा क्षेत्राचा निकाल घोषित केला व अवसरे यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. (प्रतिनिधी)