रामाचे आदरातिथ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 00:33 IST2017-02-24T00:33:52+5:302017-02-24T00:33:52+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रेंगेपार कोहळी येथे आयोजित सात दिवसीय खडीगंमत

रामाचे आदरातिथ्य
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रेंगेपार कोहळी येथे आयोजित सात दिवसीय खडीगंमत महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मोहाडी तालुक्यातील नवेगाव (बुज) येथील शाहीर राजहंस देवगडे व मंडळाने सादर केलेल्या ‘रावणाघरी रामाचा पाऊणचार’ या प्रसंगाने साजरा झाला. गण गायनानंतर त्यांनी गवळण प्रस्तुत केली.
राम व रावणांचे वैर प्रसिद्ध आहे. झाडीपट्टीतील लोकरामायणानुसार मंदोदरीच्या आग्रहामुळे रावणाने रामाला भोजनाकरीता बोलावले. ही डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची कल्पना प्रसंगरूपात खडीगंमतीत नागपूर व मुंबई या महानगरांसह थेट अलाहाबाद येथे सादर करण्यात आली. तेच दृष्य पाहण्याची संधी महोत्सवात प्रेक्षकांना मिळाली. सहशाहीर किसन शेंडे यांनी साथ दिली. सुरेश बावणे यांच्या ढोलकीवर अतुल करूटकार व पवन सुसीर यांनी नर्तकीचे काम करून पे्रक्षकांना रिझविले. गमत्या इसुलाल वाघाडे याने हसविण्याची कामगिरी पार पाडली अंकुश बावने यांनी झिलकारी हे क्लोट वाजविला. चोनक्या किशोर लोंदास तर टाळकरी अरुण देवगळे यांनी झिलकारी म्हणून काम सांभाळले. प्रसिद्ध शाहीर शाम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली गायन केले. यावेळी वसंत खडसे, हेमराज कापगते यांनी मनोगत व्यक्त केले. कलाकारांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शाहीर सुबोध कानेकर यांनी तर संचालन शाहीर आत्माराम बागळे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)