सभापतिपदी रायपूरकर, बुराडे, हटवार, खोब्रागडे, तलमले
By Admin | Updated: January 25, 2017 00:38 IST2017-01-25T00:38:48+5:302017-01-25T00:38:48+5:30
नगरपरिषद निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करून नगरविकास आघाडीने सत्तेची चाबी स्वत:कडे ठेवली.

सभापतिपदी रायपूरकर, बुराडे, हटवार, खोब्रागडे, तलमले
आघाडीला सभापतिपद : भाजपा, सेना, काँग्रेसचे समाधान
पवनी : नगरपरिषद निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करून नगरविकास आघाडीने सत्तेची चाबी स्वत:कडे ठेवली. समितीच्या सभापतीपदाची मंगळवारला झालेली निवडणूक त्याचे बोलके उदाहरण आहे. भाजपा - सेना व काँग्रेसचे समाधान करून नगरविकास आघाडीने स्वत:च्या नगरसेवकांकडे महत्वाच्या समितीची धुरा सोपविली आहे.
नगरविकास आघाडीने जनतेमधून नगराध्यक्षा पूनम विलास काटेखाये यांना निवडून आणण्यात यश मिळविले. त्यापाठोपाठ काँग्रेस सोबत सलगी करून एक उपाध्यक्ष व एक नामनिर्देशित सदस्यपद बहाल करून बहुमत सिद्ध केले. नगराध्यक्ष पूनम काटेखाये या स्थायी समितीच्या सभापती आहेत. उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर यांचेकडे आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापतिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भाजपाच्या नगरसेवक अनुराधा बुराडे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद तर शिवसेनेच्या नगरसेवक रोशनी बावनकर यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतीपद देण्यात आले आहे. नगरविकास आघाडीचे नगरसेवक सुधीर खोब्रागडे यांच्याकडे पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नगर विकास आघाडीच्या नगरसेवक पुनम हटवार यांच्याकडे बांधकाम समितीचे सभापतीपद देण्यात आले आहे. नगरविकास आघाडीचे नगरसेवक नरेश तलमले यांच्याकडे शिक्षण समिती सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)