पावसाची रिपरीप सुरूच

By Admin | Updated: September 9, 2014 23:14 IST2014-09-09T23:14:29+5:302014-09-09T23:14:29+5:30

जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गोसे धरण भरले आहे. त्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे काल रात्री उघडण्यात आले होते.

Rainy rehearsal continues | पावसाची रिपरीप सुरूच

पावसाची रिपरीप सुरूच

भंडारा : जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गोसे धरण भरले आहे. त्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे काल रात्री उघडण्यात आले होते. आज सकाळपासून १६ दरवाजे अर्ध्या मिटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सततच्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लाखांदूर : पावसाने सुरुवातीला शेतकऱ्यांना तोंडघशी पाळले. मात्र उशिरा कां? होईना सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावत एकाच दिवसात ११५.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. ८३ अंशत: घरांची पडझड घेऊन सव्वाचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ओपारा मार्ग पुन्हा एकदा बंद झाल्याने लाखांदूर तालुक्याशी संबंध तुटला.
सन २०१४ ला पावसाने अनेकदा हुलकावणी दिली नव्हे. शेती हंगामाच्या कालावधीत शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाची चटके देत दुबार पेरणीसारखे संकट निर्माण केले. तरीपण शेतकऱ्यांनी हंगाम पूर्ण केला. सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली. अवघ्या तीन तासात विक्रमी पावसाची नोंद पहिल्यांदाच झाल्याने भिती निर्माण झाली. यापूर्वी प्रशासनाकडून वर्तविण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा फोल ठरल्याने नागरीकांत भिती संचारली होती. दोन दिवसात १६७.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
शासकीय निर्देशानुसार ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यास अतिवृष्टी जाहीर करून नुकसानीचा आकडा गोळा करून आर्थिक मदत जाहीर केली जाते. यंदा दि. २२ जुलैला ८०.३ मि.मी., २३ जुलैला १११ मि.मी. व आता ७ सप्टेंबरला ११५.९ मिमी पावसाची नोेंद म्हणून या वर्षी तिसऱ्यांदा अतिवृष्टी तालुक्यात झाली. सध्यास्थितीत पावसाची सरासरी नोंद ७२५.९ एवढी झाली तर याच कालावधीपर्यंत सन २०११ ला १,३६४ मि.मी., २०१२ ला १,४५९ मि.मी. तर २०१३ ला ८ सप्टेंबर पर्यंत १,७८३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
शासकीय आकडेवारीच्या आधार अंशत: नुकसाने झालेल्या घरांची संख्या ८३, अंशत: नुकसान झालेल्या गोठ्यंची संख्या ३, एकूण ४ लक्ष १२ हजार रुपयाची नुकसानीची आकडेवारी पाठविण्यात आली आहे. सर्वात जास्त नुकसान भागडी गावात झाले असून १८ घरांची पडझड झाली. तर लाखांदूर येथील सुरेश प्रधान यांचे घर रात्री पडल्याने शेळ्या, घरचा सामान व दबल्याने तसेच कवेलू व भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. मात्र जीवीत हानी झाली नाही.
नाले भरभरून वाहू लागल्याने काठावरील हजारो हेक्टर धानशेती पाण्याखाली आली. ओपारा गावाजवळील पुलावर नित्याप्रमाणे सात फुट पाणी चढल्याने तालुक्याशी संपर्क तुटला. मडेघाट, पिंपळगाव, वडसा, तई, पालांदूर मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर वैनगंगा, चुलबंद नदीचे पाणी वाढतच असल्याने जर का गोसे धरणाचे पाणी सोडल्यास पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती बळावली आहे.
लाखनी : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीच्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात दि. ८ रोजी ७९ मि.मी. पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात ८९६.७ मि.मी. पाऊस पडला आहे. तालुक्यात पावसामुळे २७ घरांची अंशत: पडझड झालेली आहे. तर २ घरे पूर्णपणे पडली आहेत. लाखोरी येथील दाजीबा मोतीराम कळनायके यांचे घर पडले. पोहरा येथील एका व्यक्तीचे घर पावसामुळे पडले आहे. तालुक्यात पालांदूर (चौ.) भागातील अनेक घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील सालेभाटा, राजेगाव, मोरगाव, मुंडीपार येथे अनेक घरांची पडझड झाली आहे. मोरगाव येथे ३ गोठ्यांची पडझड झालेली आहे. तालुक्यात धानाची रोवणी आटोपली आहे. तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे तलाव भरत आहे.
साकोली : तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. काही दिवसांपासून घरी ठेवलेले रेनकोट पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे.
(लोकमत न्युज नेटवर्क)

Web Title: Rainy rehearsal continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.