साकोली तालुक्यात पावसाची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2015 00:55 IST2015-08-09T00:55:43+5:302015-08-09T00:55:43+5:30
चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मागील चारपाच दिवसांपासून तुरळक पावसाने दिलासा दिला आहे.

साकोली तालुक्यात पावसाची झळ
पिकांना जीवदान : ६५ टक्के रोवणी पूर्ण, घरे व गोठे पडून १ लक्ष ८० हजाराचे नुकसान
साकोली : चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मागील चारपाच दिवसांपासून तुरळक पावसाने दिलासा दिला आहे. तालुक्यात पावसाची झड कायम असल्याने वाळत असलेल्या पिकांना जीवदानच मिळले आहे. तालुक्यातील ६५ टक्के रोवणी आटोपली असून या पावसाच्या रिपरीपमुळे तालुक्यातील काही गावात घराच्या व गोठयाच्या भिंती पडून १ लक्ष ८० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर १७ व २३ जून या कालावधीत पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे अधिक उत्पन्नाची आशा पदरी घेवून असलेल्या तमाम शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या आटोपल्या. मात्र त्यानंतर निसर्गाची वक्रदृष्टी पडली आणि पाऊस बेपत्ता झाला.
तब्बल २५ दिवस पावसाचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे या कालावधीत शेतकरी पुरता खचून गेला. पेरण्यांची अवस्था त्याला पाहवत नव्हती. पाऊस पडावा ही एकच इच्छा त्याची होती. काही शेतकऱ्यांनी वाळत चाललेल्या पेरण्यांना मोटारपंपाने पाणी देवून जगविले.
रोवणी आटोपली पण पाऊस पडत नसल्याने जमिनीला भेगा पडल्या. रोवणी केलेले पिक पिवळसर झाले. याच कालावधीत शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट अधिक गडद झाले होते. परंतु जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले आणि दिलासा मिळाला. (तालुका प्रतिनिधी)
तालुका गारठला !
गेल्या चार पाच दिवसापासून तालुक्यात पावसाची झड कायम आहे. शिवाय वाराही वाहत आहे. त्यामुळे सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. हिवाळा ऋतुत शरीरात जशी हुडहुडी भरते अगदी तशीच हुडहुडी भरली आहे. उकाड्याने त्रस्त असलेल्या या पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे.
१.८० लाखांचे नुकसान
साकोली तालुक्यात या पावसामुळे १ लक्ष ८० हजाराचे नुकसान झाले. यात साकोली सर्कल १२, एकोडी सर्कल ६ सानगडी सर्कलमध्ये ३ असे एकूण २१ घरांच्या व गोठ्यांच्या भिंती पडून नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. नुकसान भरपाईची प्रतीक्षा आपादग्रस्तांना आहे.