वृक्ष लागवडीसाठी वसुंधरेला पावसाची संजीवनी

By Admin | Updated: July 2, 2016 00:36 IST2016-07-02T00:36:21+5:302016-07-02T00:36:21+5:30

वृक्ष लागवड करण्यासाठी पाऊस येईल काय, अशी चिंता तहसिलदारांना सतावत होती.

Rainfall of rain for the plantation of trees | वृक्ष लागवडीसाठी वसुंधरेला पावसाची संजीवनी

वृक्ष लागवडीसाठी वसुंधरेला पावसाची संजीवनी

प्रोजेक्ट ग्रीनची प्रशंशा : जिल्हाधिकाऱ्यांनी लावले वृक्ष
राजू बांते  मोहाडी
वृक्ष लागवड करण्यासाठी पाऊस येईल काय, अशी चिंता तहसिलदारांना सतावत होती. त्यांनी वृक्षासाठी पाण्याची व्यवस्था केली होती पण, 'प्रोजेक्ट ग्रीन'ला निसर्गाची साथ मिळाली. अन् दुपारनंतर वृक्ष लागवड करण्यासाठी वसुंधरेला पावसाची संजिवनी मिळाल्याचा आनंद अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येत होता.
आज दोन कोटी वृक्षारोपण लागवडीचा संकल्प शासनाने राबविला. शासनाचा उद्देश सफल व्हावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. पण, तहसिल कार्यालय मोहाडीने वेगळेपण दाखविणारा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्विपणे राबविला. तहसिल कार्यालयाला २५ वृक्ष लागवडीचा उद्दिष्ट होते, असे असताना तहसिलदार धनंजय देशमुख यांनी प्रोजेक्ट ग्रीन ही संकल्पना मांडून जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा विशेष कार्यक्रम करून दाखविला.
या संदर्भात लोकमतने प्रोजेक्ट ग्रीनची संकल्पना प्रकाशित केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विशेष दखल घेतली. त्यांनी मोहाडी येथे येण्याची स्वईच्छा तहसिलदार मोहाडी यांच्याकडे दर्शविली होती. त्यानुसार त्यांचे स्थानांतरण शिक्षण आयुक्त पुणे येथे झाले. ते येणार काय याकडे तहसिल कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा लागली होती. पण, योगायोग असा की, मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार व ज्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला ते अभिजित चौधरी मोहाडी येथे सायंकाळी ४.३० वाजता आले. त्यांच्यासह भंडारा जिल्हा पालक सचिव दिपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उपविभागीय अधिकारी संपत खिल्लारी या अधिकाऱ्यांचा ताफा मोहाडी तहसिलमध्ये पोहचला.
जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार, पालक सचिव दीपक कपूर यासह सर्वांनी एक-एक रोपट्यांचे वृक्ष लागवड केली. विस्तीर्ण क्षेत्रात वृक्ष लागवड बघून प्रोजेक्ट ग्रीनची प्रशंशा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी केली. आज सकाळपासून ७५० वृक्षाची लागवड तहसिल परिसरात करण्यात आली. यापूर्वी सकाळी आमदार चरण वाघमारे यांनीही वृक्ष लावले. तीन हजार वृक्ष लागवडीचे संकल्प आहे. त्यासाठी विविध प्रकारची ३५ हजार रूपयांची दोन तीन वर्ष वयाची झाडे लागवडीसाठी आणली गेली आहेत. वृक्ष लागवड तर होईल. पण, पाण्याचे काय याबाबत तहसिलदारांना चिंता होती. त्यांनी पाण्याचे टँकर बोलावून घेतले होते. तथापि, दुपारी २ नंतर पावसाने प्रोजेक्ट ग्रीनला सलामी देवून वृक्ष लागवडीला पावसाची संजीवनी दिली. यावेळी धान्य दुकानदार, केरोसीन दुकानदार, तलाठी, कोतवाल, गावातील तरूणांनी वृक्ष लागवड केली.

अन् नागरिकांना आश्चर्य झाला...
आज मोहाडी येथे जिल्हाधिकारी येणार हे ठरलं होते. पण, अचानक मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार, सद्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी मोहगाव/देवी येथे येवून सर्वांना आश्चर्यांचा धक्का दिला. दोन्ही जिल्हाधिकारी व पालक सचिव दिपक कपूर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात न बसता त्यांनी चावडीवर बसणे पसंत केले. जिल्हाधिकारी येण्याची खबर गावात पोहचताच नागरिकांनी चावडीवर गर्दी केली. यावेळी सरपंच राजेश लेंडे, ग्रामसेवक भास्कर डोमळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. वृक्षलागवडी संबंधी, रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्यांनी मजुरी मिळाली काय, शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप केला गेला काय, शेतीची स्थिती, गावातील समस्या आदी बाबीची चौकशी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व धीरजकुमार यांनी संवाद साधला. जलशिवार योजनेत गाव आणण्यासंबंधी ग्वाही दिली. गावकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्षपणे सरपंच राजेश लेंडे यांनी मांडल्या. यावेळी राजेंद्र निंबाळकर, खिल्लारी, धनंजय देशमुख, गजानन लांजेवार, ललीत कुंभरे, तुरकर तसेच ग्यानीराम साखरवाडे, उमेद लेंडे, सुनिल धांडे, मिताराम साखरवाडे, श्रीराम आंबिलकर, धनंजय काळे, सुभाष साठवणे उपस्थित होते.

गाव विकासाचे स्वप्न साकारत ते पूर्णत्वास जात आहेत. तथापि प्रशासकीय अडचणी येतात. त्यामुळे गावाच्या विकासात अडथडा येतो. अधिकाऱ्यांनी सामाजिक दृष्टीकोन ठेवून जनप्रतिनिधींना सहकार्य करावे.
-राजेश लेंडे, सरपंच, मोहगाव/देवी.

Web Title: Rainfall of rain for the plantation of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.