९० दिवसात बरसला ८४ टक्के पाऊस

By Admin | Updated: August 31, 2015 00:28 IST2015-08-31T00:28:19+5:302015-08-31T00:28:19+5:30

मागील वर्षीच्या ७३२ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८७४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Rainfall 84% rain in 90 days | ९० दिवसात बरसला ८४ टक्के पाऊस

९० दिवसात बरसला ८४ टक्के पाऊस

सरासरी ८७४ मिमी पाऊस : वार्षिक सरासरी गाठणे अशक्य, ४५६ मिमी पावसाची गरज
देवानंद नंदेश्वर  भंडारा
मागील वर्षीच्या ७३२ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८७४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ३० आॅगस्टपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ८४ टक्के आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या अवघ्या दोन महिन्यात ४५६ मिमी पाऊस पडणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा परिस्थिती यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात रोवणी ८६ टक्के आटोपली आहे. त्यामुळे रोवलेल्या धानपिकाच्या कोवळ्या रोपांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार ३० आॅगस्टपर्यत जिल्ह्यात १,०३८.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत ८७४.७ मिमी पाऊस पडला आहे.
सर्वसाधारणपणे पावसाच्या पाच महिन्यात, म्हणजे १ जून ते ३० आॅक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १,३३०.२ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र पावसाळ्याचे आता केवळ दोन महिने शिल्लक असताना ८५९.५ मिमी पाऊस पडल्याने अपेक्षेएवढा पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याचे संकट शकते.
पावसाच्या पाच महिन्यातील तालुकानिहाय प्रमाण पाहता भंडारा तालुक्यात आॅक्टोेंंबर अखेरपर्यंत १,२६०.८ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असताना आतापर्यंत केवळ ८९६.७ मिमी पाऊस पडला आहे. मोहाडी तालुक्यात १,२६०.८ मिमी पावसाची अपेक्षा असताना ९२७.९ मिमी, तुमसर तालुक्यात १,२६०.८ मिमीऐवजी आतापर्यंत ७९३.३ मिमी पाऊस झाला.
पवनी तालुक्यात १,२२७.४ मिमीऐवजी आतापर्यंत केवळ ८२७ मिमी पाऊस पडला आहे. साकोली तालुक्यात १,३९९.१ मिमीच्या तुलनेत केवळ ८९७.९ मिमी, लाखांदूर तालुक्यात १,४५१.३ मिमीच्या तुलनेत ८५०.४ मिमी व लाखनी तालुक्यात १,४५१.३ मिमी पडतो. मात्र आतापर्यत ८१ टक्के म्हणजे ९२९.५ मिमी पाऊस झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी संभ्रमावस्था आहे.
लाखांदुरात सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यातील तालुकानिहाय वार्षिक सरासरी पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास लाखांदूर तालुक्यात सर्वात कमी ७४ टक्के तर भंडारा व मोहाडी तालुक्यात सर्वाधिक ९४ टक्के पाऊस झाला. यासह तुमसरमध्ये ८० टक्के, पवनीत ८९, साकोली ८३, लाखनीत ८४ टक्के पाऊस पडला आहे.
आला पोळा, पाऊस झाला भोळा
आॅक्टोबर अखेरपर्यंत पावसाची नोंद घेतली जात असली तरी पोळ्यानंतर पाऊस येण्याची शक्यता कमीच असते. 'पोळा आणि पाऊस झाला भोळा' असे म्हटले जाते. येत्या १३ दिवसांवर आलेल्या पोळ्यापर्यंत असा किती पाऊस पडणार याची काळजी सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी पाऊस वगळता अनेक ठिकाणी अनेक दिवसात पावसाने हजेरी लावलेली नाही. उलट चक्क ऊन पडत आहे. त्यामुळे कोवळी पिकं पाण्याअभावी माना टाकत आहेत.

Web Title: Rainfall 84% rain in 90 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.