पावसाची पाठ, धानपीक धोक्यात
By Admin | Updated: August 30, 2014 01:40 IST2014-08-30T01:40:31+5:302014-08-30T01:40:31+5:30
मागील २०-२५ दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने परिसरातील धानपिक धोक्यात आले असून या परिसरावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.

पावसाची पाठ, धानपीक धोक्यात
विरली (बु.) : मागील २०-२५ दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने परिसरातील धानपिक धोक्यात आले असून या परिसरावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
यावर्षी हंगामाच्या सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना आशा दाखविली. शेतकऱ्यांनी कसेबसे आपले रोवणे आटोपले. मात्र गेल्या २०-२५ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले असून शेतकऱ्यांनी रोवण्यासाठी आणि रासायनिक खतांसाठी केलेला खर्च व्यर्थ जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोटारपंपाद्वारे पाणीपुरवठा करून आपले पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. मात्र वेळी अवेळी होत असलेल्या विद्युत भारनियमनामुळे शेतीला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकत नाही.
परिणामी, शेतकरी पुरता हतबल झाला असून पीक कसे वाचविता येईल या विवंचनेत सापडला आहे. मोटारपंपधारक शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याने केवळ निसर्गावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांची आपले पीक वाचविण्याची आशा मावळली आहे. शेतकऱ्यांची यावर्षीही सुटका कठीण असून आधीच कर्जाच्या ओझ्याने बुजबुजलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. शासनाने लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)