रेल्वे सुरक्षा बल कार्यालय बनले मदिरालय
By Admin | Updated: November 26, 2015 00:37 IST2015-11-26T00:37:40+5:302015-11-26T00:37:40+5:30
रेल्वेस्थानक तथा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता तुमसर रोड येथे दक्षिण पूर्व रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय सुरु केले.

रेल्वे सुरक्षा बल कार्यालय बनले मदिरालय
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह : महिला बंदिगृहासमोर आढळल्या दारुच्या बाटल्या, तुमसर रोड येथील प्रकार
मोहन भोयर तुमसर
रेल्वेस्थानक तथा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता तुमसर रोड येथे दक्षिण पूर्व रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय सुरु केले. या कार्यालयात सुरक्षा अधिकारी तथा इतर कर्मचारी कार्यरत आहे. कार्यालयाजवळ महिला व पुरुष बंदीगृहाजवळ मद्याच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई - हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर तुमसर रोड दक्षिण पूर्व रेल्वेचे महत्वपूर्ण जंक्शन आहे. दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय नागपूर असून त्यांचे अंतर केवळ ८१ कि.मी. आहे. नागपूर नंतर गोंदिया व तुमसर रोड येथे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व इतर कर्मचारी आहेत. काही महिन्यांपूर्वी भंडारा रोड येथे सुरक्षा बलाचे कार्यालय सुरु करण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल कार्यालयासह अधिकारी व इतर रेल्वे पोेलिसांची नियुक्ती केली. येथील रेल्वे सुरक्षा बल कार्यालय खूप जुने आहे. या कार्यालयाशेजारीच पुरुष व महिला बंदीगृह आहेत. महिला व पुरुष बंदीगृहासमोर मद्याच्या काही रिकाम्या बाटल्या येथे दिसून आल्याने रेल्वेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या संपत्तीसह रेल्वे प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी ज्या महत्वपूर्ण कार्यालयाकडे आहे त्या कार्यालयाच्या आवारातच मद्याच्या रिकाम्या बॉटल्स दिसणे ही अत्यंत निंदणीय व चिंतेची बाब आहे. ऐरवी रेल्वे सुरक्षा बल कार्यालयाकडे जाण्याची कुणीच हिंमत करीत नाही. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी येथे तैनात राहत असल्याने मद्याच्या रिकाम्या बाटल्या कोण नेणार असा प्रश्न उपस्थित होतो. या सुरक्षा बलाचे कर्मचारी येथे मद्य प्राशन करतात काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. रिकाम्या मद्याच्या बाटल्या महिला पुरुष बंदीगृहासमोर पडून असल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेल्वेचे नियम अतीशय कडक आहेत. रेल्वे पोलीस बंदीगृहात महिला व पुरुषांचे दोन कक्ष वेगवेगळे आहेत. ऐरवी पुरुष आरोपी बंदीगृहात राहतात तर महिला आरोपी बंदीगृहात क्वचितच ठेवण्यात येते, परंतु आरोपी येथे सुरक्षित राहणार काय? असा प्रश्न येथे उपस्थित होतो. रेल्वे प्रशासन प्रवासी सुरक्षेचा दावा करतो, रेल्वे स्थानक परिसरात व विशेषत: सुरक्षा बल कार्यालयाशेजारी अनधिकृत रिकाम्या मद्याच्या बाटल्या आढळणे ही गंभीर बाब निश्चितच आहे. सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीया गंभीर घटनेची दखल घेणे गरजेचे आहे. काही दिवसापूर्वी कार्यालयातच धुम्रपान करण्याच्या घटना घडत होत्या, हे विशेष.