रेल्वे मंत्रालयाचा नवीन रेल्वे ट्रॅकला ब्रेक
By Admin | Updated: August 11, 2015 00:45 IST2015-08-11T00:45:09+5:302015-08-11T00:45:09+5:30
तुमसर ते तिरोडी पर्यंतच केवळ रेल्वे ट्रक असून तिरोडी ते कटंगी ११ कि.मी. पर्यंत रेल्वे ट्रॅक तयार करण्याकरिता रेल्वे मंत्रालयाने ब्रेक लावला आहे.

रेल्वे मंत्रालयाचा नवीन रेल्वे ट्रॅकला ब्रेक
११ कि.मी. चा रेल्वे मार्ग : तिरोडी कटंगी रेल्वे ट्रॅक अपूर्णावस्थेत
तुमसर : तुमसर ते तिरोडी पर्यंतच केवळ रेल्वे ट्रक असून तिरोडी ते कटंगी ११ कि.मी. पर्यंत रेल्वे ट्रॅक तयार करण्याकरिता रेल्वे मंत्रालयाने ब्रेक लावला आहे. कटंगी बालाघाट जबलपूर पर्यंत रेल्वे ट्रॅक सुरु आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही केवळ ११ कि.मी. चा रेल्वे ट्रॅक तयार झाला नाही. मध्यभारतात जाणारा हा एकमेव रेल्वे ट्रॅक मैलाचा दगड ठरू शकतो हे विशेष.
तुमसर रोड मुंबई हावडा या प्रमुख रेल्वेमार्गावर रेल्वे स्थानक आहे. तुमसर तालुक्यात डोंगरी बु. चिखला व मध्यप्रदेशातील तिरोडी येथे जगप्रसिद्ध मॅग्नीचजच्या खाणी आहेत. या खाणीतील मॅग्नीजची देशात तथा परदेशात निर्यात करण्याकरिता सर्वप्रथम तुमसर रोड तिरोडीपर्यंत रेल्वे ट्रॅक इंग्रजांनी तयार केला होता. सातपुडा पर्वत रांगातील टेकड्या फोडून ब्रिटीशांनी हा रेल्वे मार्ग तयार केला होता. तुमसर रोड ते तिरोडी हे ४२ कि.मी. चे अंतर आहे. या मार्गावर लहान मोठे आठ रेल्वेस्थानक ब्रिटीशांनी तयार केले होते. सध्या केवळ तुमसर, गोबरवाही, डोंगरी बु. तिरोडी रेल्वेस्थानक केवळ सुरु असून उर्वरीत रेल्वेस्थानकाची दूरवस्था झाली आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
तिरोडी ते कटंगीचे अंतर केवळ ११ कि.मी. आहे. कटंगी पर्यंत रेल्वेट्रॅक तयार करण्याची मागणी खूप जुनी आहे. येथे कामाचे भूमीपूजन झाले होते. परंतु काम पूर्णत्वास केव्हा येईल असा प्रश्न येथे पडला आहे. कटंगी बालाघाट जबलपूर पर्यंत रेल्वे ट्रौक असून या मार्गावर प्रवाशी तथा मालगाड्या दररोज धावतात. तिरोडी ते कटंगीपर्यंत रेल्वे ट्रॅक तयार झाला तर मध्यभारतात जाण्याकरिता सर्वात जलद, सोयीचा तथा वेळेची बचत करणारा एकमेव रेल्वे मार्ग ठरू शकतो. परंतु लोकप्रतिनिधींचे सातत्याने येथे दुर्लक्ष होत आहे.
मध्यप्रदेशात झालेल्या अपघातानंतर व्हाया इटारसी मार्गे प्रवासी गाड्या सोडाव्या लागल्या होत्या. तुमसर तिरोडी कटंगी रेल्वेट्रॅक पूर्ण झाला तर हा रेल्वे मार्ग सुरक्षित व वेळेची बचत करणारा ठरू शकतो. भंडारा तथा बालाघाट येथील खासदारांनी दिल्लीत ही समस्या मांडून ती सोडविण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)