दुचाकीच्या धडकेने रेल्वे फाटकाचे तुकडे
By Admin | Updated: November 7, 2015 00:24 IST2015-11-07T00:24:13+5:302015-11-07T00:24:13+5:30
तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील तुमसर रोड येथे रेल्वे फाटकाला एका भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिली. यात रेल्वे फाटकाचे दोन तुकडे झाले

दुचाकीच्या धडकेने रेल्वे फाटकाचे तुकडे
दुचाकीस्वार पसार : दोन तास तुमसर-गोंदिया महामार्ग बंद
तुमसर : तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील तुमसर रोड येथे रेल्वे फाटकाला एका भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिली. यात रेल्वे फाटकाचे दोन तुकडे झाले. दुचाकीस्वार धडक मारून पसार झाला. यामुळे तुमसर गोंदिया राज्य महामार्ग दोन तास बंद पडला. बायपास रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण करण्यात आली होती. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली.
तुमसर रोड येथे तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वरील रेल्वे फाटकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. यात रेल्वे फाटकाचे दोन तुकडे पडले. घाबरलेल्या दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून धूम ठोकली. रेल्वे क्रॉसिंगवरून मालगाडी येण्याच्या काही मिनिटांपूर्वी हा अपघात झाला. यामुळे रेल्वे फाटकावर एकच खळबळ माजली. प्रसंगावधानाने रेल्वे कर्मचाऱ्यांची वाहतूक बंद केली. अन्यथा अपघाताची शक्यता होती.
कॅबीनवरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्टेशन अधीक्षकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन तासात फाटक दुरुस्त केली. पर्यायी बायपास रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली, परंतु अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
सरासरी एका महिन्यातून किमान दोन वेळा रेल्वे फाटकाला येथे धडक दिली जाते. धडक दिल्यावर वाहने पळून जाण्यास यशस्वी होतात. तुमसर रोड येथे रेल्वे पोलीस ठाणे आहे. या फाटकावर रेल्वे प्रशासनाने किमान एका पोलिसाची कायमस्वरुपी ड्युटी लावणे गरजेचे आहे. रेल्वे कॅबीनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे. परंतु रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)