तरुणांचा रस्त्यावर ‘राडा’
By Admin | Updated: May 13, 2015 00:55 IST2015-05-13T00:55:56+5:302015-05-13T00:55:56+5:30
एका बीअर बारमध्ये दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर राड्यात होऊन काही युवकांना बेदम चोप देण्यात आला.

तरुणांचा रस्त्यावर ‘राडा’
भंडारा : एका बीअर बारमध्ये दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर राड्यात होऊन काही युवकांना बेदम चोप देण्यात आला. ही घटना शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील एका बीअरबारमध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे काही काळासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
सध्या लग्न समारंभ धडाक्यात सुरू आहे. विवाहासाठी वधू-वरांकडील मंडळींमध्ये युवकांचाही समावेश असतो. मंगळवारी शहरातील एका विवाह समारंभासाठी एकत्र आलेल्या युवकांनी विवाहाचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी मद्यप्राशन करण्याचा बेत आखला. या युवकांचे एक टोळके शहरातील जिल्हा परिषद चौकातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका बीअर बारमध्ये बसले. दरम्यान त्यातील काही युवकांमध्ये वाद झाला. बारमधील वाद विकोपाला गेल्याने तो राष्ट्रीय महामार्गावर आला. यात काही युवकांना बेदम मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकातील एकाच्या डोक्यावर वीट व बीअरची खाली बॉटल फोडण्यात आली. तर काही युवक एकमेकांच्या मागे धावत असताना परिसरातील नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत होते.
बारमधील राडा चक्क राष्ट्रीय महामार्गावर सुरू असल्याने त्याला एखाद्या चित्रपटात होणाऱ्या हाणामारीचे स्वरूप आले होते. या राड्यामुळे वाहतूक व्यवस्था काहीकाळ विस्कळीत झाली होती. तर मारहाण एवढी भयावह होती की, उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. (शहर प्रतिनिधी)