शिवसैनिकांचा जिल्हा परिषदेत राडा

By Admin | Updated: January 13, 2017 00:13 IST2017-01-13T00:13:58+5:302017-01-13T00:13:58+5:30

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र हटविल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सीईओंच्या कक्षात राडा केला.

Rada in Shivsainik's Zilla Parishad | शिवसैनिकांचा जिल्हा परिषदेत राडा

शिवसैनिकांचा जिल्हा परिषदेत राडा

साहित्यांची तोडफोड : अधिकारी, पोलीस व शिवसैनिकांच्या बैठकीनंतर वातावरण निवळले
भंडारा : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र हटविल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सीईओंच्या कक्षात राडा केला. त्यापूर्वी अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन धुडगुस घातला. त्यानंतर शिवरायांची तसबीर लावल्यानंतर वातावरण निवळले.
जिल्हा परिषदेत चार महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शरद अहीरे हे रूजू झाले. या कक्षातील भिंतीवर सुरूवातीपासून शिवरायांचे छायाचित्र होते. नवीन वर्षाच्या प्रारंभी हे छायाचित्र तिथून हटविण्यात आले. ही बाब गुरूवारला दुपारी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आताचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा कृषी सभापती नरेश डहारे आणि शिवसेनेचे पदाधिकारी यशवंत सोनकुसरे यांना माहित झाली. त्यानंतर त्यांनी आज गुरूवारला सीईओंच्या कक्षात प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रकार पाहिला असता त्यांना शिवरायांचे छायाचित्र दिसले नाही. यावर मंथन सुरू असतानाच ही बाब शिवसैनिकांना माहित झाली. त्यानंतर शेकडोच्या संख्येने शिवसैनिक जिल्हा परिषदेत आले आणि तोडफोड सुरू केली.
या प्रकाराला जबाबदार धरून शिवसैनिकांनी आपला मोर्चा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुधीर वाळके यांच्या कक्षाकडे वळविला. वाळके हे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या कक्षात असल्याचे कळताच शिवसैनिकांनी त्या कक्षाकाडे कुच केली. तिथे वाळके दिसताच शिवसैनिकांनी त्याच कक्षातील टेबल-खुर्च्यांची तोडफोड केली. लोखंडी कपाटाच्या काचा फोडल्या. स्वीय सहायकांच्या टेबलवरचा टेलिफोन आपटून फोडून टाकला. याशिवाय जिल्हा परिषदेतील कचरा पेट्या फेकल्यामुळे कचरा अस्ताव्यस्त झाला. भिंतीवर टांगलेली टपालपेटी फोडून टाकली.
या आंदोलनात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, शहरप्रमुख सुर्यकांत ईलमे, जिल्हा उपप्रमुख अनिल गायधने, संजय रेहपाडे, शहर उपप्रमुख यशवंत सोनकुसरे, मुकेश थोटे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सुधीर वाळके व नरेंद्र भोंडेकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांमध्ये बैठक झाली. त्यापूर्वी शिवाजी महाराजांचे नवीन छायाचित्र कक्षात लावण्यात आले. या बैठकीत पोलीस तक्रार करणार नसल्याची माहिती सूत्राने दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Rada in Shivsainik's Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.