रबीनेही सोडली शेतकऱ्यांची साथ

By Admin | Updated: March 12, 2015 00:23 IST2015-03-12T00:23:17+5:302015-03-12T00:23:17+5:30

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाकडे बघितले जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली तर हा कणा कसा मोडून जातो, याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे.

Rabina also left with the farmers | रबीनेही सोडली शेतकऱ्यांची साथ

रबीनेही सोडली शेतकऱ्यांची साथ

भंडारा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाकडे बघितले जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली तर हा कणा कसा मोडून जातो, याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने कलाटणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता रबीतही गहू, हरभरा, मिरची आदी पिकांचे उत्पादन घटत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खरिपानंतर आता रबीची आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येऊ पाहत आहे.
खरीप हंगामात पाऊस न पडल्याने कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे उत्पादन कमालीचे घटले. त्यानंतर उत्पादन खर्चही भरुन निघाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यानंतर एक हंगाम उत्पादनाविनाच गेला व रबीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली. यात टरबुज, गहू, हरभरा, तूर, भाजीपाला आदी पिकांची पेरणी जिल्ह्यात झाली आहे.
सुमारे ६० हजार हेक्टरवर रबीचा पेरा होता. मात्र पावसाचे प्रमाण नसल्याने ओलिताखालील शेतजमिनीना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी पाहिजे त्या प्रमाणात रबी पिकांना पाण्याचा पुरवठा झाला नाही. दुसरीकडे रबी पिके निघत असताना अवकाळी पाऊस झाला. यात फळधारणेवर असलेला गहू- हरभरा आणि मिरची पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच आता तूर, हरभरा, गहू, मिरची ही पिके निघत असताना या पिकांचा उतारा घटत चाललेला आहे.
एकरी खर्च करण्यात आलेला उत्पादन खर्चही भरुन निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. खरिपाचे पीक हातून गेल्यामुळे त्या तुलनेत शेतकऱ्यांनी रबी पिकांच्या उत्पादनासाठी महागडी बियाणे, खते, औषधी व आधुनिक पद्धतीने शेती तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत.
परंतु निसर्गाच्या दुष्टचक्राचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
शेतकऱ्यांना खरिपानंतर रबी पिकाची आशा असते. खरिपाच्या उत्पादनात सावकार आणि बँकाचे कर्ज फेडून दिवाळी साजरी करायची तर रबी पिकात मुलामुलीचे लग्न व उर्वरित कर्ज फेडायचे असे शेतकऱ्यांचे सर्वसामान्य गणित असते. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून कधी अतिवृष्टीने तर कधी पाऊस नसल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे.
खरिपातील बियाण्याची उधारी ठेऊनच शेतकऱ्यांनी रबी हंगामाची बियाणे खरेदी केली. परंतु, उतारी घटत असल्यामुळे शेतकऱ्यांना मुलभूत गरजा भागविताना कष्ट सोसावे लागत आहे. शासन मात्र तुटपुंजी नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Rabina also left with the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.