पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार
By Admin | Updated: May 9, 2016 00:27 IST2016-05-09T00:27:22+5:302016-05-09T00:27:22+5:30
गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असूनही तालुक्यातील खापरी (रेहपाडे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेला कित्येक वर्षापासून प्रलंबित होता.

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार
खापरी येथे सभा : उपजिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आश्वासन
पवनी : गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असूनही तालुक्यातील खापरी (रेहपाडे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेला कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. गावठाणासाठी पुरेशी जमीन उपलब्ध होत नसल्याने स्वेच्छा पुनर्वसनाचा मुद्दा समोर आलेला होता. ग्रामसभेत ७० टक्के ग्रामस्थांनी स्वेच्छा पुनर्वसनाची तयारी दाखविल्यामुळे जिल्हा प्रशासन व पुनर्वसन विभागाने संयुक्त सभा आयोजित करुन स्वेच्छा पुनर्वसन पाहिजे असल्यास तीन महिन्यात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले आहे.
खापरी (रेहपाडे) गाव गोसेखुर्द धरण व उमरेड - कऱ्हांडला-पवनी अभयारण्यामुळे प्रभावित झालेला आहे. गावाचे एका बाजुला धरणामध्ये साठविलेले पाणी व दुसरी बाजूला अभयारण्याचे जंगल व त्यातील हिंस्त्र प्राण्यापासून उद्भवणारा त्रासामुळे ग्रामस्थ भयग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे ही त्यांची रास्त अपेक्षा आहे. गावातील बहुसंख्य लोकांनी स्वेच्छा पुनर्वसनासाठी आवेदनपत्र भरुन दिल्यामुळे खात्री करण्याच्या उद्देशाने गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसन विभागाने गावात शनिवारला सभेचे आयोजन केले होते. सभेला उपस्थित उपजिल्हाधिकारी विजया बनकर, कार्यकारी अभियंता काळे, तहसिलदार एस. के.वासनिक, गट विकास अधिकारी बी. वाय. निमसरकार व सरपंच रेहपाडे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी ग्रामस्थांकडून गावठाण की स्वेच्छा पुनर्वसन ते जाणून घेतले. बहुसंख्य लोकांनी स्वेच्छा पुनर्वसनास होकार दिल्याने येत्या तीन महिन्यात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागु शकतो. तसेच ज्यांना भुखंड पाहिजे आहे त्यांना उपलब्ध गावठाणामध्येच भुखंड उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वस्थ केले. संपूर्ण गावास गावठाण पाहिजे असल्यास पुन्हा पाचवर्षे पुनर्वसनासाठी लागु शकतात अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली. (तालुका प्रतिनिधी)