गुणवत्तेचा पायाच कच्चा
By Admin | Updated: August 8, 2015 00:42 IST2015-08-08T00:42:45+5:302015-08-08T00:42:45+5:30
गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याचा डंका पिटणाऱ्या जिल्हा परिषद शाळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पायाच कच्चा होत चालला आहे.

गुणवत्तेचा पायाच कच्चा
विज्ञान, गणित शिक्षकांचा अभाव : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
राजू बांते मोहाडी
गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याचा डंका पिटणाऱ्या जिल्हा परिषद शाळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पायाच कच्चा होत चालला आहे. सहावी ते आठवीला विज्ञान, गणित विषय शिकविण्यासाठी तब्बल ४१ बी.एस.सी. अर्हता शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
बालकांचा शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. तथापि, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान - गणित विषयाच्या शिक्षकांची उणीव आहे. मोहाडी तालुक्यात बीएससी अर्हता धारक ४५ शिक्षकांची आवश्यकता असून कार्यरत ४२५ शिक्षकांपैकी चारच शिक्षक मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. मोहाडी तालुक्यात सहावी ते सातवीच्या ४० शाळा आहेत. सातवीला आठवा वर्ग जोडलेल्या ११ शाळा आहेत.
यात हिवरा, नेरी, पाहुणी, निलजखुर्द, पिंपळगाव, देव्हाडा, मांडेसर, रोहणा, ताळगाव, रोहा व ढिवरवाडा येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. या शाळांपैकी सहावी ते आठवीसाठी बीएससी शिक्षक ताळगाव, हरदोली, नेरी व रोहणा या चारच जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत आहेत. आर.टी.ई. कायद्याप्रमाणे सहावी ते आठवीच्या वर्गासाठी विज्ञान विषयासाठी ४५ पदे मंजूर आहे. भाषा विषयासाठी १८ तर सामाजिक शास्त्रासाठी ४१ पदे मंजूर आहेत.
यापैकी सामाजिक शास्त्र व भाषा विषयासाठी शिक्षक आहेत. विज्ञान व गणित विषयासाठी शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे भाषा विषयाचेच शिक्षक गणित व विज्ञान या विषयाचे अध्यापन करीत आहेत. विज्ञान व गणित हे दोनही विषय तांत्रिक आहेत. येथे त्या विषयात शैक्षणिक अर्हता धारक शिक्षक त्या विषयाला न्याय देऊ शकतो. परंतु पर्याय नसल्यामुळे ढकलगाडी सुरू आहे.
यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पायाच कच्चा बनत चालला आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. ग्रामीण भागातला मराठी शाळेतला विद्यार्थीसुद्धा दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश करू लागला आहे. परंतु, प्राथमिक शाळेतून विज्ञान व गणित हे दोन विषय कच्चे राहत असल्यामुळे गुणवत्ता कशी वाढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील शैक्षणिक सत्रात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बीएससी, बारावी विज्ञान तरुणांची स्थानिक पातळीवर मानधनावर नियुक्ती केली होती. हा प्रयोग यशस्वी झाला. मात्र यावर्षीचे नियोजन दिसून येत नाही.
अलीकडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. दरवर्षी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोवर शिक्षक भरती बंद राहणार असण्याची शक्यता आहे. नवीन भरती करताना ‘टेट’मध्ये ऊतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असणार आहे. पुढची भरती करताना विज्ञान व गणित विषयासाठी बी.एस.सी. बी.एड. शिक्षकांची नियुक्ती करावी लागणार आहे. जोपर्यंत नवीन भरती होत नाही तेवढे वर्ष सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान विषयाचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
कलम ९ काय सांगते
शिक्षण हक्क कायद्यानुसार व विद्यार्थी शिक्षक प्रमाणानुसार असावेत. जर नसल्यास जिल्हा परिषदेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोतातून शाळा व शिक्षक हक्क कायद्यातील निकषानुसार पूर्तता करावी.
विज्ञान व गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा अभाव हा मोहाडी तालुक्यातील नाही तर भंडारा जिल्ह्यात आहे. किंबहूना ही समस्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या शाळांचीसुद्धा आहे.