आरक्षण सोडतीमुळे प्रस्थापितांना धक्का
By Admin | Updated: January 19, 2015 23:59 IST2015-01-19T23:59:22+5:302015-01-19T23:59:22+5:30
जिल्ह्यात सद्यस्थितीत भाजपमय वातावरण आहे. भाजपने पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर लोकसभा आणि अलिकडेच विधानसभा काबीज करुन गड जिंकला आहे.

आरक्षण सोडतीमुळे प्रस्थापितांना धक्का
भंडारा : जिल्ह्यात सद्यस्थितीत भाजपमय वातावरण आहे. भाजपने पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर लोकसभा आणि अलिकडेच विधानसभा काबीज करुन गड जिंकला आहे. सोमवारला झालेल्या आरक्षण सोडतीनंतर बदललेल्या क्षेत्रातून नवीन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. या निवडणुकीवरच दोन वर्षांनंतर येणाऱ्या भंडारा - गोंदिया विधान परिषदेचे समिकरण अवलंबून राहणार आहे.
सोमवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिलिंद बन्सोड उपस्थित होते. या आरक्षण सोडतीमुळे जिल्हा परिषद क्षेत्रातील राजकीय समिकरण पुर्णत: बदलणार आहे. आतापर्यंत जे ५२ सदस्य होते त्यापैकी ४९ क्षेत्रातील उमेदवारांना आरक्षणाचा फटका बसला आहे.
महिलांचा वाटा ५० टक्के
५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत मागीलवेळी ३३ टक्के महिला आरक्षणामुळे महिला सदस्य संख्या १८ होती. यावेळी ५० टक्के महिला आरक्षणामुळे महिला सदस्य संख्या २६ राहणार आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गामधून पाच, अनुसूचित जमाती प्रवर्गामधून दोन, ओबीसी प्रवर्गामधून सात आणि खुला प्रवर्गामधून १२ असे एकूण २६ महिला उमेदवार राहतील.
सात पंचायत समितीमधील १०४ क्षेत्रांपैकी ५२ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे सत्तेत महिलांचा वाटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)