जिल्ह्यात ५० हजार क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:25 IST2018-10-31T22:25:28+5:302018-10-31T22:25:54+5:30
दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.

जिल्ह्यात ५० हजार क्विंटल धान खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत.
भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने धानपीक संकटात आले. एका पाण्याअभावी धानाचे उत्पन्न घटले. गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान काढणीला प्रारंभ केला. काढलेला धान घरी येत आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना हा धान विकावा लागत आहे. गतवर्षी पर्यंत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु व्हायचे. शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा योग्य मोबदला मिळत नव्हता.
यावर्षी शासनाने पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात धान खरेदीचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी ६६ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ५५ केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली. शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला धान घेऊन येत आहेत. हमीभावात धान खरेदी केला जात असून वजनातही कुठे गडबड होत नसल्याचा आधारभूत केंद्रांचा दावा आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धान घेऊन शेतकरी येत आहे. गत आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विविध आधारभूत केंद्रांवर तब्बल ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाचे पैसेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार आहे. साकोली तालुक्यातील आधारभूत केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे पैसे शेतकºयांच्या खात्यात वळते करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे दिवाळीचा सण शेतकºयांना आनंदात साजरा करण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट
अपुऱ्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. धानाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याचे शेतकरी बोलत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्रावर महिनाभरात ५० हजार क्विंटल धान विक्रीस आले आहे. हा धान शेतकऱ्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकला. त्यामुळे महिनाभरात मोठी विक्री झाल्याचे दिसून येते. दिवाळी नंतर धान केंद्रावर गर्दी ओसरेल असे बोलले जात आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. आता शासनाने भंडारा जिल्ह्यातील सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आवश्यकता आहे. परंतु आतापर्यंत तीनच तालुक्यात दुष्काळ घोषित केल्याने चार तालुक्यावर अन्याय होत आहे.