मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला भोपळा!

By Admin | Updated: December 6, 2014 00:58 IST2014-12-06T00:58:24+5:302014-12-06T00:58:24+5:30

मागील १० वर्षांपासून भंडारा जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शुक्रवारला झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला भोपळा मिळाला आहे.

Pumpkin in the extension of Cabinet! | मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला भोपळा!

मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला भोपळा!

नंदू परसावार भंडारा
मागील १० वर्षांपासून भंडारा जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शुक्रवारला झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला भोपळा मिळाला आहे. त्यामुळे पालकमंत्री आयात करण्याची वेळ भंडारा जिल्ह्यावर येणार आहे. नाना पटोले लोकसभेत गेले नसते त्यांना यावेळी मंत्रिपद मिळाले असते, या चर्चांना आता ऊत आला आहे.
भंडारा - गोंदिया जिल्हे संयुक्त असतानाही गोंदियातील नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ गळ्यात पडत होती. सन १९९९ मध्ये जिल्ह्याचे विभाजन झाले. त्यापूर्वी भंडारा संयुक्त जिल्हा असताना केवलचंद जैन, छेदीलाल गुप्ता, महादेवराव शिवणकर यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. आताही तेच झाले. अर्जुनी मोरगाव क्षेत्रातून दुसऱ्यांदा निवडून आलेले राजकुमार बडोले यांना संधी मिळाली आहे.
सन १९९४-९५ मध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सरकारमध्ये पहिल्यांदा भंडारा जिल्ह्याला विलासराव श्रुंगारपवार यांच्या रुपाने मंत्रिमंडळात संधी मिळाली होती. ते शालेय शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे हे खाते एक वर्ष होते त्यावेळी ते भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर १० वर्षे जिल्ह्यात मंत्रिपदासाठी कुणालाही संधी मिळाली नव्हती.
सन २००३-०४ मध्ये मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात बंडूभाऊ सावरबांधे यांना संधी मिळाली होती. ते अन्न व औषध खात्याचे खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे हे खाते सव्वा वर्ष होते त्यावेळी ते भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर सन २००८-०९ मध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हान यांच्या मंत्रिमंडळात नानाभाऊ पंचबुद्धे यांना संधी मिळाली होती. ते शालेय शिक्षण खात्याचे खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे हे खाते केवळ सहा महिने होते. परंतु, त्यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले नव्हते. ते गोंदियाचे पालकमंत्री होते. त्यावेळी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवर ते भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
श्रुंगारपवारांच्या पुढाकाराने
मिळाले होते धानाला अनुदान
सन १९९४-९५ मध्ये राज्यमंत्री असताना धानाचे गाढे अभ्यासक विलासराव श्रुंगारपवार यांनी धानाला अनुदान मिळवून दिले होते. त्यापूर्वी दुष्काळ पडला तरी धानाला अनुदान मिळत नव्हते. त्यानंतर मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आधारभुत धान खरेदी केंद्र सुरू करुन धानाला हमी भाव मिळवून दिला. पालकमंत्री हे त्याच जिल्ह्याचे असले तर त्यांना तेथील प्रश्नांची जाण असते, त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्याचा असावा असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तिन्ही आमदार भाजपचेच आणि तिघांचीही टर्म पहिलीच
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा व साकोली असे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. यात तुमसरचे चरण वाघमारे, भंडाऱ्याचे रामचंद्र अवसरे, साकोलीचे बाळा काशीवार हे तिन्ही आमदार भाजपचेच आहेत. तिघांचीही ही पहिली टर्म आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली असावी, असा तर्क लावण्यात येत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या आणि दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अर्जुनी मोरगाव क्षेत्रातून दुसऱ्यांदा निवडून आलेले राजकुमार बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, असावा असे मंत्रिमंडळ विस्तारातून दिसून आले आहे.

Web Title: Pumpkin in the extension of Cabinet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.