वृक्ष लागवडीच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी जनजागृती
By Admin | Updated: July 1, 2016 00:50 IST2016-07-01T00:50:39+5:302016-07-01T00:50:39+5:30
२ कोटी वृक्ष लागवडीच्या पूर्वसंध्येला येथील वनपरिक्षेत्र लाखांदूर कार्यालयाच्यावतीने आज ३० जून रोजी वनपरिक्षेत्र कार्यालयातून वृक्षदिंडीने

वृक्ष लागवडीच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी जनजागृती
लाखांदूर व पवनी येथे आयोजन : रोपट्यांसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ
लाखांदूर : २ कोटी वृक्ष लागवडीच्या पूर्वसंध्येला येथील वनपरिक्षेत्र लाखांदूर कार्यालयाच्यावतीने आज ३० जून रोजी वनपरिक्षेत्र कार्यालयातून वृक्षदिंडीने जनजागृती करण्यासाठी नायब तहसिलदार विजय कावळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती वृक्षदिंडी काढण्यात आली असून वृक्ष लागवडीविषयी लाखांदूर नगरामध्ये जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने १ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये २ कोटी वृक्ष लागवडीचा वनमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच पूर्वसंध्येला लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने आज ३० जून रोजी वृक्ष लागवडीसाठी जनसामान्य लोकांना त्यांचे महत्वपटवून देण्यासाठी वनविभाग कार्यालयातून वृक्षदिंडी काढण्यात आली.
यावेळी नायब तहसिलदार विजय कावळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वृक्षदिंडीची सुरुवात करुन दिली. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे, क्षेत्रसहायक के. के. जांगळे, नगरपंचायत अध्यक्षा निलीमा हुमने, उपाध्यक्ष नरेश खरकाटे, बी.एस. मंजेलवार, एम. एस. मंजेलवार, ए.जे. वासनिक, सय्यद, जाधव व सिध्दार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सवानिमित्त २ कोटीचे उद्दिष्टपूर्तीच्या अनुसंघाने वनविभाग भंडारा व वनपरिक्षेत्र लाखांदूरच्या वतीने येथील लाखांदूर-दहेगाव मार्गावरील अंतरगाव येथील वनविभागाच्या १० हेक्टर जागेमध्ये ११ हजार ११० वृक्षांची लागवड केली जाणार असून संपूर्ण तयारी झालेली आहे.
या संदर्भात जनजागृतीही करण्यात आली असून पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना वृक्षाचे महत्व पटवून दिले. तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनतेनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)