पं. उपाध्याय यांच्या जयंतीचा विसर
By Admin | Updated: September 28, 2015 00:55 IST2015-09-28T00:48:02+5:302015-09-28T00:55:28+5:30
शासकीय कार्यालयात वर्षभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध महापुरूषांच्या जयंतीमध्ये यंदापासून भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीची भर पडली.

पं. उपाध्याय यांच्या जयंतीचा विसर
अधिकाऱ्यांची अनास्था : बकरी ईदची सुटीमुळे झाला घोळ
प्रशांत देसाई भंडारा
शासकीय कार्यालयात वर्षभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध महापुरूषांच्या जयंतीमध्ये यंदापासून भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीची भर पडली. २५ सप्टेंबर रोजी ही जयंती अंत्योदय दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाच्या सामान्य प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या होत्या. मात्र, दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची माहिती केवळ बोटावर मोजण्याएवढ्या लोकांना आहे. बकरी ईदची सुट्टी असल्याने व त्यांच्या कार्याची महती नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात शुक्रवारी जयंती साजरी केली नाही.
पंडित दीनदयाल उपाध्याय हे जनसंघाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील नगला चंद्रभान येथे २५ सप्टेंबर १९१६ मध्ये झाला. नामवंत समाजकारणी, हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रसारामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पत्रकार आणि लेखक म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षात राहण्यासारखी होती. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून यावर्षीपासून २५ सप्टेंबर रोजी त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला. त्यांची जयंती अंत्योदय दिन म्हणून साजरी करण्याचे आदेश समान्य प्रशासन विभागाच्या वतीने सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले होते.
शुक्रवारी ही जयंती येत असल्याने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची धावपळ उडाली आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय हे कोण? याची माहिती नाही. त्यांचे कार्य माहित नाही. जयंती साजरी करण्यासाठी पंडीत उपाध्याय यांचे छायाचित्रही शासकीय अधिकाऱ्यांकडे व बाजारातही त्यांचे छायाचित्र उपलब्ध नव्हते. अधिकाऱ्यांनी इंटरनेटवर उपलब्ध असणारे छायाचित्र डाऊनलोड करून हे छायाचित्र पेममध्ये बसविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला असता तर जयंती साजरी झाली असती. मात्र, बकरी ईद असल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर झाली होती. त्यामुळे अधिकारी तर सोडाच कोणताही कर्मचारीही कार्यालयाकडे भटकले नाहीत.
शुक्रवारी बकरी ईद, शनिवारी चौथा शनिवार व नंतर रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला पाठ दाखवित गावाकडे किंवा अन्यत्र हे दिवस घालविले. भाजप प्रणीत महाराष्ट्र सरकारने जनसंघाचे अध्यक्ष राहिलेल्या पंडीत दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्याचे अध्यादेश काढले असले तरी, शासन निर्णयानंतरच्या पहिल्या जयंतीला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तिलांजली वाहन्यात आली.