मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता अधांतरी
By Admin | Updated: October 16, 2014 23:20 IST2014-10-16T23:20:08+5:302014-10-16T23:20:08+5:30
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने समाजकल्याण (राज्य) कार्यायलाची निर्मिती करण्यात आली. मात्र निकषाप्रमाणे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता अधांतरी
भंडारा : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने समाजकल्याण (राज्य) कार्यायलाची निर्मिती करण्यात आली. मात्र निकषाप्रमाणे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्तीसह देण्यात येणारा निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या खातेपुस्तिकांवर जमा झाला नसल्याने विद्यार्थी या भत्त्यापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांचा पैसा कुठे गायब झाला हा प्रश्न अधांतरी आहे. या आशयाची विचारणा विद्यार्थी करू लागला आहे.
महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. यात अनुसूचित जाती, जमाती व इतर जातीतील विद्यार्थी तसेच अन्य प्रवर्ग वगळता शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क मिळून शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात येते. त्यापैकी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात निर्वाह भत्ता जमा करून उर्वरीत सर्व रक्कम संबंधित महाविद्यालयकडे सोपविण्यात येते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृती वेळेवर मिळावी आणि शिष्यवृत्ती त्याच वर्षी मिळावी यासाठी शासनाने सन २०१२ पासून आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला बँकेत खाते उघडून त्याचे खाते क्रमांक समाजकल्याण विभागाकडे पाठविणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी ही योजना काटेकोरपणे राबविली. मात्र पाच वर्र्षांपासून जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता जमा झालाच नाही. निर्वाह भत्त्याची रक्कम मिळत नसेल तर शिष्यवृत्तीची गरज काय असा प्रश्न विद्यार्थी उपस्थितीत करीत आहेत. अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांला पाच हजार ५०० रुपये तर अन्य गटाला जवळपास २००० रुपये भत्ता मिळतो. समाजकल्याण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता त्यांच्या खात्यात जमा करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)