लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, अनेक भागांत धान लागवडीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. मात्र, शेतीपंपासाठी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा केला जात आहे.
परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत महावितरण व शासनाविरुद्ध कमालीची नाराजी असून, शेतकऱ्यांना धान लागवडीच्या हंगामात दिवसाला किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांची रात्रीला होणारी गैरसोयी दूर करावी, सर्पदंशाचे धोक टाळावे, अशी मागणी होत आहे.
रात्रीला पंप सुरू करण्यास जाणे धोकादायकशेतीपंपाला विद्युत पुरवठा रात्री होत असल्याने रात्रीच्या वेळी कृषीपंप सुरू करण्यासाठी जाणे अत्यंत कठीण असते. अनेकांचे शेत हे गावापासून व घरापासून दूर असल्याने रात्री पाणी देण्यासाठी जाणे धोकादायक ठरते. याशिवाय साप, विंचू आणि अन्य वन्यप्राण्यांचाही धोका असतो. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे.
शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरजपावसाची अनिश्चितता, वाढती इनपुट कॉस्ट, बाजारातील भावाचे चढ-उतार यामुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच वीज पुरवठ्यासाठी गैरसोयीचा वेळ, त्यामुळे संकट अधिकच वाढले आहे.
"मागील अनेक वर्षांपासून दिवसा किमान १२ तास वीजपुरवठ्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दिवसाच्या वेळेत वीज दिल्यास शेतकरी सुरक्षितपणे शेतकाम करून चांगले उत्पादन सहज घेऊ शकतो. परंतु हे वास्तव शासनाला केव्हा कळेल ?"- ठाकचंद मुंगुसमारे, अध्यक्ष, महाकाल संस्था तथा शेतकरी