लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा): पालोरा, जांभोरा, करडी, कोका परिसरातील शेतकऱ्यांनी १६ तासांऐवजी केवळ १२ तास कृषी वीज पुरवठा करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ, बुधवार, २ जुलै रोजी जांभोरा येथून पायदळ पदयात्रा काढून करडी येथील वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना लागणारा किमान १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी हे आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
१२ फेब्रुवारी रोजी १६ तास वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी करत उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यावेळी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी भेट देऊन १२ तास वीज पुरवठ्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे उपोषण सोडवण्यात आले होते.
वीज वितरण विभागाने पुढील १० दिवस १२ तास वीज पुरवठा केला, मात्र नंतर ते पुन्हा ८ तासांवर कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. शेतकऱ्यांना पीक घेताना पाणी आणि विजेची अत्यंत गरज असल्याने त्यांनी शेतात बोअरवेल लावले असून वीज कनेक्शनही घेतले आहे. मात्र ८ तासांमध्ये वारंवार वीज कट होऊन खऱ्या अर्थाने फक्त ४ ते ५ तास विजेचा पुरवठा होत आहे.
१५ गावकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा१६ ते १२ तास वीज पुरवठा होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलकांचा पवित्रा लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त चोख आहे.
वरिष्ठांचा आदेश आल्यावरच निर्णयमोहाडी वीज वितरण विभागाचे उपविभागीय अभियंता सुनील मोहुर्ले यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे ही मागणी कळविली आहे, मात्र तिथून अद्याप कोणताही आदेश मिळालेला नाही. पुढील कारवाईसाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयाला शेतकऱ्यांच्या मागणीचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात यांचा समावेशआंदोलनामध्ये यादोराव मुगमोडे, ताराचंद समरीत, विश्वनाथ गोबाडे, रूपेश ठवकर, संतोष गोबाडे, गिरीश साठवणे, गोविंदा गोबाडे, अशोक गोबाडे, मारोती आगाशे, सूरचंद बिसने, राजेश गोबाडे, पांडुरंग मुगमोडे यांचा समावेश आहे. कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप आंदोलनाची दखल घेतली नसल्याने, १६ तास वीज पुरवठा मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.