कृषी पंपासाठी चोवीस तास वीजपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:13+5:302021-07-19T04:23:13+5:30
भंडारा : शासन प्रशासनाच्या विद्युत वितरण विभागाने मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपासाठी चोवीस तास वीजपुरवठा करणारा ...

कृषी पंपासाठी चोवीस तास वीजपुरवठा करा
भंडारा : शासन प्रशासनाच्या विद्युत वितरण विभागाने मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपासाठी चोवीस तास वीजपुरवठा करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती करतात. धान पिकाच्या शेतीसाठी जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते. यासाठी गावागावात तळे तयार करण्यात आले. त्यानंतर शासन प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतावर विहीर, शेततळे, बोअरवेल या जलस्रोतांची योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी रीतसर अर्ज सादर केला, अशा निकषपात्र शेतकऱ्यांना लाभांकित करण्यात आले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी स्वअर्थार्जनातून आपल्या शेतावर विहीर, बोअरवेल, शेततळे यासारख्या जलस्रोतांची व्यवस्था आहे आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी कृषी पंप वीजपुरवठ्यासाठी विद्युत वितरण विभागाच्या संबंधित यंत्रणेकडे रीतसर अर्ज सादर केले असता संबंधित विभागाने कृषी पंप वीज जोडणी करून वीजपुरवठा सुरू केला आहे. परंतु कृषी पंपाचा वीजपुरवठा नियमित सुरू राहत नसल्याने सिंचन कसे करावे व शेतातील पिके कशी जगवावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी पंपाचा वीजपुरवठा वेळोवेळी खंडित करण्यात आल्याने सिंचनाअभावी शेतातील धान पिकाची रोपे करपत असून रोवणी खोळंबली आहे. सिंचनाअभावी धान पिकाची रोवणी कशी करावी, असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर आवासून उभा ठाकला आहे. विद्युत वितरण विभागाच्या उपेक्षित धोरणामुळे धान उत्पादक शेतकरी नागवला जात असून ते हतबल, चिंतातुर, हवालदिल झाले आहेत.
शिष्टमंडळात भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमणे, उमाकांत काणेकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, नरेंद्र कांबळे, शांताराम खोब्रागडे, धनराज तिरपुडे, बंडू फुलझेले, रतन मेश्राम, जयेंद्र मुल, विजय भोवते, डॉ. विवेक मोटघरे, नितीश काणेकर आदींचा समावेश होता.