वन्यप्राण्यांचे रक्षण ही चळवळ व्हावी
By Admin | Updated: October 3, 2015 00:37 IST2015-10-03T00:37:41+5:302015-10-03T00:37:41+5:30
भारत देशात वनसंपदेची खाण आहे. वन्यप्राणी व पशु पक्षी ही जंगलाची शान असून त्यांनासुद्धा मानवाप्रमाणेच जीवन जगण्याचा अधिकार आहे.

वन्यप्राण्यांचे रक्षण ही चळवळ व्हावी
ग्रीन हेरिटेजचा पुढाकार : वन्यजीव सप्ताह
भंडारा : भारत देशात वनसंपदेची खाण आहे. वन्यप्राणी व पशु पक्षी ही जंगलाची शान असून त्यांनासुद्धा मानवाप्रमाणेच जीवन जगण्याचा अधिकार आहे. पशु-पक्ष्यांची अनेक दुर्लभ जाती समृद्ध वनात आहेत. परंतु काही समाजकंटकांमुळे वन्य प्राणी धोक्यात आले आहे. त्यांचे रक्षण ही काळाची गरज आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील ग्रीन हेरिटेज संस्थेने पुढाकार घेतला आहे.
वाढती लोकसंख्या, अवैध शिकार, औद्योगिकरण व प्रदूषणामुळे पशु-पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता वन्य जीवांचे रक्षण व संवर्धन करणे, आपणही ‘जगा आणि जगू द्या’ यानुसार प्राणीमात्राबद्दल दयाभाव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
भारतासारख्या निसर्ग उपासक देशात मुक्या पशु-पक्ष्यांची शिकार अनेक वर्षापासून सुरू आहे. समुद्ध वनांतील गौरव, रंगीबेरंगी पक्ष्यांची शिकार होत असून बाजारात विकायला आणतात. या पशु-पक्ष्यांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. कावळे, चिमण्या, गिधाड यांची संख्या अल्प झाली आहे. हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. मानवविना पक्षी जिवंत राहू शकतील, पण पक्ष्यांविना मानवाला जगणे कठीण जाईल.
जंगलात पाण्याविना आणि शिकाऱ्यांमुळे वन्य प्राण्यांचे जीवन संकटात सापडले आहे. वाढती उष्णता व आगीमुळे वनातील प्राणी, वन्यजीव गावांकडे किंवा शहराकडे धाव घेतात. रस्त्यावरील दुर्घटनेत आपले नाहक जीव गमावतात. पाण्यात विष टाकून व विद्यत प्रवाहाने प्राण्यांचा जीव घेतला जातो. याबाबत जनजागृतीची गरज आहे. राष्ट्रांच्या या अनमोल संपत्तीला आज वाचविण्यासाठी अत्यंत गरज आहे. पृथ्वीवर राहायला जागा नसेल म्हणून मुक्या प्राण्यांचे लचके तोडणे, त्यांची शिकार करणे हे थांबले पाहिजे नाही तर भविष्यात निसर्ग आपत्ती व महासंकटांशी सामोरे जावे लागणार आहे. हा सर्व प्रकार उघड्या डोळ्याने न बघता, या सर्वात आपला सक्रिय सहभाग घ्यावा लागेल.
निसर्ग संरक्षणाबरोबरच प्राणी व वन्य जिवांचेही संरक्षणाकरिता जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांचे रक्षण केले तरच आपले व पुढील पिढींचे भवितव्य सुरक्षित राहील. दि.१ ते ७ आॅक्टोबर विश्व वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जनजागृतीत सर्वांनी सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)