जमिनीचे आरोग्य रक्षण करा
By Admin | Updated: December 6, 2015 00:36 IST2015-12-06T00:36:02+5:302015-12-06T00:36:02+5:30
सजीवाला आरोग्य असते. त्यामुळे आरोग्याचे रक्षण करणे गरजेचे असते.

जमिनीचे आरोग्य रक्षण करा
अवसरे यांचे प्रतिपादन : १९ हजार मृद आरोग्य पत्रिका वाटणार
भंडारा : सजीवाला आरोग्य असते. त्यामुळे आरोग्याचे रक्षण करणे गरजेचे असते. त्याचप्रकारे जमिनीला जीवन असल्यामुळे जमिन आपल्या गभार्तुन वृक्षाला जन्म देते. जमिनीमधील अंकुर वाढविण्यासाठी जमिनीतील अन्न द्रव्ये करणीभूत ठरतात. जमिनीची पत वाढवायची असेल तर आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. खतांच्या हल्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत आहे. त्यासाठी जमिनीचे परिक्षण करुन जमिनीचे आरोग्य राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.
राष्ट्रीय मृद आरोग्य अभियानांतर्गत जागतिक मृद आरोग्य दिनाचा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नलिनी भोयर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, कृषी विकास अधिकारी सुधीर किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे उपस्थित होते.
यावेळी आ. अवसरे म्हणाले, शेतकऱ्यांनी अनावश्यक प्रमाणात जमिनीमध्ये खतांचा वापर केल्याने सुपिकता कमी झाली आहे. जमिनीच्या प्रकृतीचे आरोग्य योग्य ठेवण्यासाठी ही आरोग्य तपासणी फार महत्वाची आहे. त्यासाठी गावातील ग्रामसेवक व तलाठी यांना या प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.कृषि विभागाने त्यादृष्टीने प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा मृद संधारण अधिकारी मुरेकर म्हणाले, आरोग्यदायी जीवनासाठी आरोग्यदायी माती याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने जमिनीचे आरोग्य तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. माती अन्न यंत्रणेचा पाया आहे. जैविविधतेचे पोषण माती करते. पृथ्वीवरील १५ ते २० से.मी. माती तयार होण्यासाठी तीन हजार वर्ष लागतात. परंतु आज या मातीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मुलद्रव्याचे शोषण होत असून सुपिकता कमी होत आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी तीन वर्षात मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करावयाचे आहे. पहिल्या टप्यात १९ हजार मृद आरोग्य पत्रिका वाटणार येणार आहे. मातीचे परिक्षण केल्यानंतर त्यानुसार खतांचा कमी जास्त वापर करण्याच्या सूचना देतात. खताच्या खर्चात बचत होते. मातीचे पोषण मुल्य, मातीचे संवर्धन करुन ही लोकचळवळ व्हायला पाहिजे.
प्रास्ताविकात डॉ. नलिनी भोयर म्हणाल्या, जमिनीचे आरोग्य योग्य राखण्यासाठी तीचे संवर्धन व तीचा विकास करणे आवश्यक आहे. यावेळी घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. रिलायन्स फाऊडेशन तर्फे शेतकऱ्यांच्या कृषि विषयक समस्या व माहिती देण्यासाठी व्हाईस एसएमएस तयार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरगकर, प्रगतिशील शेतकरी संजय एकापूरे, विनोद बांते, डॉ.नितीन तुरस्कर यांनी मार्गदर्शन केले. संचालन आत्माच्या उपसंचालक माधूरी सोनवाणे यांनी तर आभार तालुका कृषि अधिकारी गणविर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)