पावसाळ्यात फळबागेचे योग्य नियंत्रण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:32+5:302021-09-08T04:42:32+5:30
किशोर पात्रीकर : आंबा बागायतीला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव पालांदूर : नव्याने फळबागायत केलेल्या शेतकऱ्यांनी बागेत लक्षपूर्वक नियोजन करणे ...

पावसाळ्यात फळबागेचे योग्य नियंत्रण करा!
किशोर पात्रीकर : आंबा बागायतीला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
पालांदूर : नव्याने फळबागायत केलेल्या शेतकऱ्यांनी बागेत लक्षपूर्वक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रसशोषक किडी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. तेव्हा फळ बागायतीत लक्ष पुरविण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी केले आहे.
पालांदूर येथील सुमारे सलग चार एकरातील आंब्याच्या बागेत निरीक्षणाअंती बागायतदाराला मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी पर्यवेक्षक अशोक जिभकाटे, कृषी सहायक वैशाली खांदाडे, सचिन झझाळ, शेतकरी वर्गात टिकाराम भुसारी, धनराज नंदुरकर व मजूर वर्ग उपस्थित होता.
भंडारा जिल्ह्यात प्रमुख पीक म्हणून भात आहे. भात क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्याला धान्याचे कोठार संबोधले जाते. मात्र धान उत्पादक शेतकरी अजूनही समस्यांत अडकलेला आहे. तेव्हा पर्यायी पिके निवडून होतकरू शेतकऱ्यांनी फळबागेकडे लक्ष केंद्रित केले आहे. नव्याने लागवड केलेल्या फळ बागायतदारांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने तालुका कृषी अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम शेतशिवारात हजेरी लावत आहे. पालांदूर येथील उल्हास पद्माकर भुसारी यांच्या फळबागेला भेट देऊन झाडांची पाहणी करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांना पावसाळी दिवसातील किडींची माहिती देण्यात आली. कीड नियंत्रणाकरिता व झाडाची उत्तम वाढ होण्याकरिता शास्त्रशुद्ध अभ्यास पुरविण्यात आला.
पालांदूर येथे उल्हास भुसारी यांनी सलग चार एकरात आंब्याची बाग लावली आहे. सुमारे ३५० ते ४०० झाडांची लागवड करण्यात आली. लंगडा व दशेरी ही आंब्याची जात निवडण्यात आली. सरी-वरंब्यावर झाडांची लागवड करून ठिंबक सिंचन योजनेचा उपयोग करण्यात आला आहे. लाखनी तालुक्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत १३६.८० हेक्टरवर आंबा पिकाची लागवड केली आहे. पालांदूर कृषी मंडलअंतर्गत ४३.३३ हेक्टरवर नियोजित आहे.
कोट बॉक्स
नवीन आंबा कलमे लागवड झालेल्या ठिकाणी कलमांच्या जोडाच्या खाली फूट वाढीस लागते. ही फूट अन्नद्रव्य व पाणी शोषून घेऊन मूळ कलमांच्या वाढीवर विपरित परिणाम करते. त्यामुळे ताबडतोब वेळीच ही फूट धारदार सीकेटरने कापून टाकावी. पावसाळ्यात कलमाभोवती जमिनीमध्ये पाणी साचू देऊ नये. पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी. झाडे सरी-वरंब्यावर लावावीत. भुरी व इतर रोगांचा तथा तुडतुडे व कोळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फवारणी करावी.
- किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.
सुमारे ३५० ते ४०० आंब्याची झाडे लावलेली आहेत. पाच बाय पाच मीटर अंतरावर झाडांची लागवड केली आहे. नवे काही करण्याच्या प्रयत्नातून फळबागेचा प्रयत्न केला आहे. रासायनिक खत, औषध न वापरता जैविक, हर्बल, सेंद्रिय खत व औषधांचा वापर सुरू आहे.
- उल्हास भुसारी, बागायतदार पालांदूर.