कनिष्ठांना पदोन्नती; वरिष्ठांना डावलले
By Admin | Updated: December 15, 2015 00:45 IST2015-12-15T00:45:44+5:302015-12-15T00:45:44+5:30
जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस नायक यांना डावलून अन्य जिल्हा तसेच राज्य राखीव पोलीस दलातून आलेल्या पोलिसांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

कनिष्ठांना पदोन्नती; वरिष्ठांना डावलले
पदोन्नतीवरून जिल्हा पोलीस दलात संताप : गऱ्हाणी सांगावी तरी कुणाला!, गृहविभाग लक्ष देईल काय?
भंडारा : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस नायक यांना डावलून अन्य जिल्हा तसेच राज्य राखीव पोलीस दलातून आलेल्या पोलिसांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवाज्येष्ठनेनंतरही पदोन्नती मिळत नसल्याने पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
भंडारा पोलीस दलातून गोंदिया जिल्हा वेगळा झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दलातून अनेक कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस दलात समाविष्ठ करण्यात आले. सन १९९९ ते २००७ या कालावधीत एकूण १२१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस शिपाई पदावर नियमानुसार घेऊन त्यांना त्यांच्या बॅचच्या मागे लावण्यात आले. त्यानंतर सन २००८ पासून सन २०१३ पर्यंत एकूण ९८ पोलीस कर्मचाऱ्यांना घेण्यात आले. त्यातील ६९ कर्मचाऱ्यांना त्यांचे मुळ जिल्ह्यातील पोलीस नायक पदावर व २९ कर्मचाऱ्यांना पोलीस शिपाई म्हणून घेण्यात आले.
त्यानंतर जिल्ह्यातील व सन २००० ते २००८ पर्यत आंतरजिल्हा बदलीवर आलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून सन २००८ नंतर आंतरजिल्हा बदलीवर आलेल्या ६९ पोलीस नायकांना त्यांची मुळ जिल्ह्यातील पोलीस नायक पदाची पदोन्नती तारीख कायम ठेऊन त्यापैकी ४३ कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच उर्वरित २६ कर्मचाऱ्यांना नायक पदाच्या ज्येष्ठता सुचीत वरिष्ठ स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील स्थानिक सेवाज्येष्ठतेने वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठतेवर अन्याय झाला आहे.
भविष्यात काही कर्मचाऱ्यांनी चूक नसतानाही हे कर्मचारी सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार पदाच्या पदोन्नतीपासून वंचित राहणार आहेत. त्यांना नायक पदावरुनच निवृत्त व्हावे लागणार आहे. त्यांची पूर्ण सेवा होऊनसुद्धा खालच्या पदाचे निवृत्तीवेतन घ्यावे लागणार आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पदोन्नतीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
(नगर प्रतिनिधी)