लाखांदूर : कोणतीही निवडणूक आली कां हवसे, गवसे आणि नवसे सारेच चार चाकी वाहनातून फिरण्याची संधी सोडत नाहीत. परंतु, आता परिस्थिती बदलली असून प्रचार करायचा मात्र वातानुकुलीत वाहने प्रचारकर्त्याच्या नशिबी आल्याचे चित्र दिसून येत आहे.महायुती तुटली - आघाडी बिघडली अन् साऱ्याच पक्षातील लहानात लहान कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना सारेच पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे लहानसहान कार्यकर्त्यांनाही अति महत्व आले आहे.एकेकाळी बैलबंडी, सायकलने प्रचार केला जात होता. तसा प्रचार करणारे कार्येकर्ते अजूनही आहेत. मात्र प्रचाराचा हायटेक प्रकार सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना वेगळा आनंद देणारा ठरत आहे. पूर्वी होत असलेला प्रचार आता चारचाकी वाहनाने होत आहे, हे ठिक असले तरी वाहन मात्र वातानुकुलितच पाहिजे हा अट्टहास पूर्ण करण्यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहे. यासाठी नव्या कोऱ्या गाडयांच्या शोधात संपूर्ण गाडया संपल्या आहेत. सर्वच पक्षांनी वाहने बुक केली आहेत. मात्र कार्यकर्त्यांची गाडयासाठीची ओरड थांबली नाही. पक्षातील वजनदार कार्यकर्त्यांचे वजन बघून गाडी दिली जाते. त्यासाठी डिझेल, पेट्रोल कुपनच्या माध्यमातून पेट्रोल पंपावरून उपलब्ध होत आहे. कुणी प्रचाराला फिरतो तर कुणी देवदर्शनाला कुणी नातेवाईकांच्या भेटी घेतो. मागून गाडी मिळाली नाही तर बघून घेईनची भाषा कार्यकर्ता वापरत असताना मनधरणी केली जाते. गाडी पण दिली जाते. खिशात चहा- नास्त्यासाठी नोट टाकली जाते. मतदानाला नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना हळू - हळू प्रचाराला वेग येत आहे. भरारी पथकाची नजर सर्वांवर असतांना तालुक्यात आचारसंहिता भंगचा एकही प्रकार घडलेला नाही. महायुती व आघाडीत एकत्र प्रचार करणारे कार्येकर्ते कोणत्या पक्षाचा झेंडा हातात धरू म्हणून वेळ काढून नेत असताना वातानुकूलीत गाडी मिळाली तर झेंडयाकडे दुर्लक्ष करून नऊ दिवस मजेत कसे काढायचे या विचाराने प्रचाराला लागतो तर तालुक्याची जबाबदारी असलेले जेष्ठ कार्येकर्ते आर्थिक समिकरण जुळविण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
प्रचारकर्त्यांचा वातानुकूलित वाहनांचा आग्रह
By admin | Updated: October 5, 2014 23:00 IST