कांदा पिकावर किडींचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: March 12, 2015 00:20 IST2015-03-12T00:20:07+5:302015-03-12T00:20:07+5:30
पवनी व लाखांदूर तालुक्यात येणाऱ्या चौरास भागात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर पीक घेण्यात येते. अकाली पावसामुळे कांद्याचे पीक प्रभावित झाले आहे.

कांदा पिकावर किडींचा प्रादुर्भाव
लाखांदूर : पवनी व लाखांदूर तालुक्यात येणाऱ्या चौरास भागात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर पीक घेण्यात येते. अकाली पावसामुळे कांद्याचे पीक प्रभावित झाले आहे. कांद्यावर विविध किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनचे उत्पन्न न झाल्यामुळे संरक्षित सिंचनाची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना आता नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे.
कांदा पिकाची लागवड करण्यासाठी शेतकर्यांनी बँकांकडून कर्ज घेतले. यावर्षी तर कांद्याचे बियाण्याचा भाव १,२०० रुपये किलो होता. रोपेदेखील महागली. अशा प्रतिकुल स्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. परंतु, अवकाळी आलेल्या पावसाने पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेत आहे. शासनाने अनुदानावर किटकनाशके द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)