नीता ठाकरे यांचे प्रतिपादन : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणभंडारा : कायदे हे महिलांच्या सबलीकरणासाठी आहेत. महिलांना जोपर्यंत पूर्णपणे संरक्षण मिळणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही, कायद्याचा परिपूर्ण वापर झाला पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेकविध कायदे आहेत. परंतु त्यांची जाणीव महिलांमध्ये नाही. पोलिसात गेलो तर बदनामी होईल या हेतुने घरघुती हिंसाचाराच्या घटना पुढे येत नाही. आज एखादी घटना छोटी वा प्राथमिक स्वरुपाची असेल जर तिला वेळीच पायबंद घातला नाही तर पुढे जावून ती घटना गंभीर स्वरुपाची होवू शकते, असे मत महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत कार्यशाळेत उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.सदर कार्यशाळेला अध्यक्षीय मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक विनिता साहु म्हणाल्या, घरघुती हिंसाचार ही संपूर्ण देशासमोरील समस्या असुन ती शिक्षित असो, अशिक्षित असो वा ग्रामिण भागातील स्त्री असो या सर्वांशी निगडित समस्या आहे. कौटुंबिक हिंसा ही सर्वात मोठी हिंसा असून अशा हिंसेला वेळीच प्रतिबंध पडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक विनिता साहु यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर म्हणाल्या की, महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने प्रामाणिक आणि सकारात्मक प्रयत्न चालविलेले आहे. त्यासाठीच महिला सरंक्षण कायदे तयार केले गेले. खोट्या तक्रारी करुन महिलांनी स्त्रीत्वाचा गैरवापर करु नये. महिलांनी कायद्यांचा उददेश व भूमिका लक्षात घेऊन कुटूंब व्यवस्था कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठीच कायद्यातील कलमांचा अंतर्भूत अर्थ समजुन घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, महिला व बाल विकास अधिकारी सुरेश ठाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी पवार आदींनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद डाबेराव यांनी कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अॅड. कविता भोंडगे, अॅड. मंजुषा गायधने, मृणाल मुनीश्वर, वैशाली केळकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे यांनी केले. तर आभार जिल्हा संरक्षण अधिकारी सुनिल माहुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी परीविक्षा अधिकारी एम. एम. आंबेडारे, विधी सेवा सल्लागार सुवर्णा धानकुटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवानंद देशमुख, तालुका संरक्षण अधिकारी भेंडारकर, लोथे, गजभिये, कोल्हे, गिरेपुंजे, बाल संरक्षण अधिकारी नितिन साठवणे, नामदेव भुरे, अजित नागोशे तथा कार्यालयातील इतर कमर्चारी वृंद यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
घरगुती हिंसाचाराला वेळीच प्रतिबंध घाला!
By admin | Updated: March 23, 2017 00:24 IST