उद्घोषणा नगर परिषदेची निवडणूक नगर पंचायतची
By Admin | Updated: October 3, 2015 00:29 IST2015-10-03T00:29:44+5:302015-10-03T00:29:44+5:30
साकोलीत नगर पंचायत ऐवजी नगर परिषद व्हावी यासाठी आमदार राजेश काशीवार यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यपालांनी नगर परिषदेची उद्घोषणा केली.

उद्घोषणा नगर परिषदेची निवडणूक नगर पंचायतची
साकोलीत द्विधा स्थिती : न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा
भंडारा : साकोलीत नगर पंचायत ऐवजी नगर परिषद व्हावी यासाठी आमदार राजेश काशीवार यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यपालांनी नगर परिषदेची उद्घोषणा केली. असे असताना राज्य निवडणूक आयोगाने नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या निवडणुकीमुळे काहींना दिलासा तर काहींना निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांनी राज्यातील सर्वच तालुका स्थळावरील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर प्रत्येक ठिकाणी तहसीलदार यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. दरम्यान सेंदूरवाफाचा समावेश करुन साकोलीत नगर परिषद व्हावी, यासाठी आमदार राजेश काशीवार यांनी शासन स्तरावर भक्कम पाठपुरावा केला. त्यानंतर राज्यपालांनी साकोलीत नगर परिषदेची उदघोषणा केली. परंतु राज्य निवडणूक आयुक्तांनी ३० सप्टेंबरला राज्यातील १३८ पैकी ६८ नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यात साकोली नगर पंचायत निवडणुकीचाही समावेश आहे. नगर परिषदेची उद्घोषणा झाल्यानंतर त्यात समाविष्ट होणाऱ्या गावातील काही इच्छुकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती, परंतु आता नगर पंचायतीमुळे त्या इच्छुकांना निवडणूक लढता येणार नाही.
काशीवारांचा पाठपुरावा सुरूच
साकोलीत नगर परिषद व्हावी यासाठी आमदार राजेश काशिवार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी राज्यपालांनी साकोली नगर परिषदेची उद्घोषणा केली. परंतु आता राज्य निवडणूक आयुक्तांनी नगर पंचायत निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे साकोलीत नगर परिषदच व्हावी, यासाठी आमदार काशीवार यांनी पुन्हा एकदा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांची आयुक्तांशी चर्चा
भंडारा जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारीया यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याशी गुरुवारला सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी साकोली नगर परिषदेच्या उदघोषणेविषयी आयुक्तांना अवगत केले. परंतु आयुक्तांनी जिल्ह्यातील चारही नगर पंचायतीविषयीची माहिती जाणून घेताना साकोली नगर परिषदेविषयी बोलण्याचे टाळले.