पेट्रोल पंपांवर समस्याच समस्या

By Admin | Updated: January 3, 2015 00:39 IST2015-01-03T00:39:21+5:302015-01-03T00:39:21+5:30

जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर मूलभूत सुविधा नाहीत. पेट्रोलपंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी सुविधा पुरविण्याचे आदेश असले तरी या आदेशाचे पालन होताना दिसत नाही.

Problems with petrol pumps | पेट्रोल पंपांवर समस्याच समस्या

पेट्रोल पंपांवर समस्याच समस्या

भंडारा : जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर मूलभूत सुविधा नाहीत. पेट्रोलपंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी सुविधा पुरविण्याचे आदेश असले तरी या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. याविषयी ग्राहकही अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
शहरातील प्रत्येक पेट्रोलपंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र वाहनांमध्ये पेट्रोल भरल्यानंतर नि:शुल्क हवा भरण्याची सुविधा नाही. शौचालय व लघुशंकेची व्यवस्थाही निटनेटकी नाही. दोन ठिकाणची सुविधा चांगली आहे. अन्य ठिकाणी या सुविधा नसल्याने विशेषत: महिला ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. पेट्रोलपंपावर सुविधाच नाही म्हणून नागरिक तोंडातून ब्र न काढता पेट्रोल भरून निघून जातात.
पेट्रोलपंपावर शेड नाही
काही पेट्रोलपंपावर शेड नसल्याने उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात ग्राहकांची गैरसोय होत असते. अशावेळी ज्या पेट्रोलपंपामध्ये शेड आहे, ग्राहक तिथेच पेट्रोल किंवा डिझेल भरायला जायला पसंती देतात.
तक्रारही देत नाही
पेट्रोलपंपावर पिण्याचे पाणी, वाहनामध्ये नि:शुल्क हवा, टेलिफोन सुविधा, प्राथमिक उपचार सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र या सुविधा ज्या पेट्रोलपंपावर नाहीत त्या पेट्रोलपंपासंबंधी नागरिक कधीच तक्रारही देत नाही. विरोध म्हणून नाही किमान हक्क म्हणून तरी नागरिकांनी पुढाकार घेतला, याचे एकही उदाहरण तक्रारीच्या स्वरूपात दिसून आले नाही.
भेसळबाबत तक्रार
शहरातील पेट्रोलपंपामध्ये मिळणारे पेट्रोल हे भेसळ आहे. याबाबतची तक्रार आजपावेतो कुणीही लिखितपणे दिली नसल्याचे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे याबाबत ऐकीवात चर्चा असली तरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या तपासणीतही कुठल्याही पेट्रोलपंपावर पेट्रोलचा किंवा डिझेलचा अशुद्ध पुरवठा होता, अशी बाब सिद्ध झालेली नाही.
जिल्ह्यात २४ पेट्रोलपंप
भंडारा जिल्ह्यात पेट्रोलपंपाची संख्या जवळपास २४ इतकी आहे. काही खाजगी कंपन्यांचे पेट्रोलपंप बंद अवस्थेत असल्याने त्यांचे आकडेवारी येथे समाविष्ट करण्यात आलेली नाही. एकट्या भंडारा शहरात सहा पेट्रोलपंप आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Problems with petrol pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.