तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न पेटला
By Admin | Updated: May 19, 2017 00:57 IST2017-05-19T00:57:52+5:302017-05-19T00:57:52+5:30
आठ महिन्यांपूर्वी वरठी येथील तलावाची पाळ फुटल्यामुळे पाणी वाहून गेले होते.

तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न पेटला
शेतकरी आंदोलनाच्या तयारीत : एसडीओंशी चर्चा, चरण वाघमारे यांनी घेतला पुढाकार
तथागत मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : आठ महिन्यांपूर्वी वरठी येथील तलावाची पाळ फुटल्यामुळे पाणी वाहून गेले होते. यात शेकडो एकर शेतातील धानपिक नष्ट झाले. परंतु त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. आठ महिन्यांपासून तलावाच्या दुरुस्तीसाठी मागणी होत असतानाही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तलावाच्या दुरुस्तीकरिता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनूले व कार्यकारी अभियंता पदमाकर पराते यांनी वरठी येथे बैठक घेऊन चर्चा केली. आमदार चरण वाघमारे यांनी दोन दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.
सदर तलाव जिल्हा परिषद भंडारा च्या लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत आहे. वरठी व मोहगाव शेतशिवारत असलेले नवीन तलाव म्हणून ओळखला जातो. जवळपास २० एकर जागेत असलेल्या या प्रशस्त तलावात चिमूटभरही पाणी नाही. मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात या तलावाची पाळ फुटल्यामुळे तलाव कोरडे पडले.
तेव्हापासून सदर तलावाची पाळ जशीच्या तशी आहे. २० एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेले हे तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षतेचे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे ज्या वर्षी हे तलाव तयार झाले तेव्हा पासून एकही वेळा या तलावाची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. पाळ फुटल्यापासून ते आतापर्यंत एकदाही लघु पाटबंधारे विभागाचे एकही अधिकारी फिरकले नाही व कामाला सुरुवात झाली नाही. पाळ ‘जैसे थे’ त्या अवस्थेत आहे. यावर्षी पावसाळ्या पूर्वी तलावाची पाळ तयार न झाल्यास तलावात पुन: पाणी राहणार नाही आणि याचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसेल.
ग्राम पंचायत वरठी येथे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनूले व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पदमाकर पराते यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सरपंच संजय मिरासे, जिल्हा परिषद सदस्य धर्मशीला उके, मोहगावचे सरपंच राजेश लेंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप उके, ग्राम पंचायत सदस्य रवींद्र बोरकर, थारनोद डाकरे शेतकरी वामन थोटे, राजू भाजीपाले, रामू चकोले, झिंगर मरघडे, शिवा गायधने, सुरेंद्र भाजीपाले व दामोदर गायधने यांच्यासह ४२ शेतकरी उपस्थित होत. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व तोडगा काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
वरठी व मोहंगाव परिसरात असलेले शेत हे पेंच प्रकल्पाच्या टेल म्हणजे शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना कधीच प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. वरठी,मोहगाव,बोथली, पांजरा व सोनूली या भागातील जवळपास ५०० एकर शेती या तलावाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी पाण्याचे दुसरे साधन नाही। गत वर्षी तलावाची पाळ फुटल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होत. वर्षभर त्यांना शेतात पीक घेता आले नाही. पाळ फुटल्यामुळे यावर्षी सुद्धा शेतात पीक लावणे म्हणजे धोका आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसनाशिवाय पर्याय नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
तर विशेषाधिकार वापरण्यास शिफारस करू - वाघमारे
सदर तलाव जिल्हा परिषद भंडारा यांच्या अखत्यारीत आहे. तलावाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद भंडारा यांची आहे. अनेकदा याबाबद आपण स्वत: लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपर्कात राहून तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न निकाली काढण्याचे सांगितले होते. जिल्हाधिकारीयांच्याशी चर्चा केली असून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना याबाबद निर्णय घेण्याचे सांगितले आहे. दोन दिवसात प्रकरण निकाली न लागल्यास आमदार निधीतून काम करू पण शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. व वेळ पडल्यास जिल्हाधिकारी यांना विशेष अधिकार वापरण्यास शिफारस करू, असे त्यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी यांची तत्परता
शेतकरी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनूले यांनी त्यांचे म्हणने एकूण घेतले. तलावाची दुरुस्ती न झाल्यास शेकडो एकर शेती धोक्यात येऊन पीक घेता येणार नाही, हे लक्षात आले. काम सुरू करण्याची मुख्य अडचण म्हणजे निधी आणि नियोजन हे लक्षात ठेवून त्यांनी लोकसहभागाची योजना शेतकऱ्यांसमोर ठेवली. जिल्ह्यातील उद्योग कंपनी यांच्या सीएसआर निधी उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांशी चर्चा आटोपून त्यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या समक्ष शेतकऱ्यांची कैफियत मांडली आहे. जिल्हाधिकारी यावर कोणता मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष
लोकसहभाग व उद्योग कंपनीच्या सामाजिक दायित्व अंतर्गत निधीतून जिल्यात मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जलयुक्त व गाळयुक्त शिवार चे काम घेतले आहेत. वरठी येथे असलेले सनफ्लॅग कंपनीच्या सीएसआर निधीतून पण कामे घेतले असल्याची माहिती आहे. परंतू अतिमहत्वाच्या या तलावाची काम या अंतर्गत का घेत नाही से समजण्या पलीकडे आहे.
ज्या गावात कंपनी आहे त्या कंपनीचा निधी दुसरीकडे खर्च करून गावकऱ्यांना दुष्काळात ठेवणे आणि निधी उपलब्ध नाही, असे म्हणणे पटण्यासारखे नाही. सनफ्लॅग कंपनीचा निधी या तलावावर खर्च करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे कोणता निर्णय घेतात याकडे