आरोपीला आजन्म कारावास
By Admin | Updated: August 10, 2014 22:48 IST2014-08-10T22:48:59+5:302014-08-10T22:48:59+5:30
अतिप्रसंग व लुटमार प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने एका आरोपीला आजन्म कारावास तर दुसऱ्या सहकारी आरोपीला पाच हजार रुपये दंड अथवा एक महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपीला आजन्म कारावास
जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : प्रकरण साकोली तालुक्यातील मिरेगाव येथील
साकोली : अतिप्रसंग व लुटमार प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने एका आरोपीला आजन्म कारावास तर दुसऱ्या सहकारी आरोपीला पाच हजार रुपये दंड अथवा एक महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण साकोली तालुक्यातील मिरेगाव येथील दोन वर्षापूर्वीचे आहे.
साकोली तालुक्यातील मिरेगाव येथील पिडीत महिला ही ५ डिसेंबर २०१२ रोजी मिरेगाववरून मुलीच्या औषधीकरिता लाखनी येथे जात होती. मात्र साधन नसल्याने ही महिला पायी जात असताना वाटेत तिला आरोपी डुडेश्वर मडावी (२८) व प्रवीण मडावी (२१) येताना दिसले. पीडित महिलेनी त्यांना थांबवून मुंडीपार फाट्यापर्यंत लिफ्ट मागितली. आरोपीने लाखनीला जात असल्याचे सांगून महिलेला मोटारसायकलवर बसवून लाखनी येथे नेले. लाखनी येथे महिलेनी औषधी घेतल्यानंतर आरोपींनी पुन्हा या महिलेला मिरेगाव येथे सोडून देतो असे सांगून तिला त्यांना मोटारसायकलवर बसवून मुंडीपार फाट्यापर्यंत आणले व येथे आल्यानंतर गाडीतील पेट्रोल संपल्याचा बहाणा केला. त्यामुळे ही महिला मुंडीपार फाट्यापासून मिरेगाव येथे पायी जाण्यास निघाली असता दोन्ही आरोपींनी या महिलेचा पाठलाग केला.
मिरेगाव मार्गावरील जंगलात डुडेश्वर मडावी याने महिलेला पकडून जंगलात ओढत नेले व मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग केला. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, बिरी व गरसोळी असे एकूण १७ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत ३४ हजार रुपये मुल्याचे हिसकावून नेले.
या हाणामारीत महिला बेशुद्ध पडली. काही वेळानंतर महिला शुद्धीवर आल्यानंतर गावी पोहचली. झालेल्या अन्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक १४३(१२) अंतर्गत कलम ३९४, ३९७, ३७६, १०९, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अभिनव देशमुख यांनी केला होता प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. जिल्हा सत्र न्यायाधीश जी.के .अकर्ते यांनी दि. ७ आॅगस्ट २०१४ रोजी आरोपी डुडेश्वर मडावी यास कलम ३९४, ३९७ नुसार १० वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये दंड तसेच कलम ३९४, ३९७ नुसार १० वर्र्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंड तसेच कलम ३५६ कलमांतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दुसरा सहकारी आरोपी प्रवीण मडावी याला ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात शासकीय अधिवक्ता म्हणून सुषमा सिंग यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून अंशूल केसळकर होते तर आरोपीकडून अॅड.के.एस. भुरे व अॅड.येळेकर यांनी युक्तिवाद केला. (तालुका प्रतिनिधी)