जनतेच्या समस्यांना प्राधान्य

By Admin | Updated: November 29, 2014 23:16 IST2014-11-29T23:16:59+5:302014-11-29T23:16:59+5:30

अतिदुर्गम भागातील गावास भेट देवून गावातील समस्या निकाली काढण्याच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी आज लाखनी तालुक्यातील सायगाव या गावास भेट दिली.

Priority of public issues | जनतेच्या समस्यांना प्राधान्य

जनतेच्या समस्यांना प्राधान्य

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : लाखनी तालुक्यातील सायगाव येथे जिल्हाधिकारी यांची भेट
भंडारा : अतिदुर्गम भागातील गावास भेट देवून गावातील समस्या निकाली काढण्याच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी आज लाखनी तालुक्यातील सायगाव या गावास भेट दिली. यावेळी त्यांनी वनहक्क दावे, उद्योग, शिक्षण, रेशनकार्ड, रस्ता दुरुस्ती, मामा तलाव दुरुस्ती व पर्यटन इत्यादी विषयांवर गावकऱ्यांकडुन मांडण्यात आलेल्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
केवळ ५५ उंबरठे असलेल्या सायगावची लोकसंख्या १९६ एवढी आहे. हे गाव जंगलव्याप्त असून जंगलावर आधारित उद्योग उभारून गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच वैयक्तीक व सामुहिक वन हक्काचे दावे तात्काळ निकाली काढावेत, किटाळी ते पेंढरी या रस्त्याची दुरुस्ती करावी, गावाची लोकसंख्या कमी असल्यामुळे शाळेची पटसंख्या कमी आहे. त्यामुळे गावातील शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे. ही शाळा बंद करू नये, मामा तलावाची ५ वर्षांपासून फुटलेल्या पाळीची दुरुस्ती करावी, अशा अनेक समस्या गावकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांचेसमोर मांडल्या.
गावकऱ्यांच्या सर्व समस्या ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील प्रत्येक समस्येवर तोडगा काढला. यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणाऱ्या वैयक्तिक व सामुहिक वनहक्काच्या दाव्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी अपील अर्ज सादर करावा. ही समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जंगली जनावरांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सोेलर कुंपण देण्यात येईल. वन विभागाने जिल्हा नियोजन समितीमध्ये यासाठी प्रस्ताव सादर करावा. मिनी अंगणवाडी, सार्वजनिक प्रसाधन गृह, शाळेची आवार भिंतही कामे बी.आर.जी.एफ, आणि १३ व्या वित्त आयोगातून प्रस्तावित करावे, अशी सूचना त्यांनी ग्रामसेवक यांना केली. मामा तलावाची दुरुस्ती जिल्हा परिषद सिंचन विभागाने करावी, तसेच तलावाचे खोलीकरण आणि सफाईचे काम रोजगार हमी योजनेतून प्रस्तावित करावे.
सायगाव नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे गावातील शाळा बंद करण्यात येवू नये यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. त्याचबरोबर २०१० मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीच्या वेळी सायगाव हे पोहरा क्षेत्राशी जोडण्यात आले जे पूर्वी पालांदूर क्षेत्रामध्ये समाविष्ट होते. मात्र पोहरा हे सायगावपासून लांब असल्यामुळे जाण्यायेण्यासाठी व प्रशासकीय कामकाजासाठी गावकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे हे गाव पुन्हा पालांदूर क्षेत्रामध्ये जोडण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावर पुढील निवडणूकीच्या वेळी शासनाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. किटाळी ते पेंढरी हा रस्ता १० किलोमिटरचा असल्यामुळे हे काम आमदार फंडातून करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली.
या गाव भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांचेसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हाधिकारी धार्मिक, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, माहिती अधिकारी मनीषा सावळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आडे, तहसिलदार जयंत पोहणकर, सरपंच संगिता शेंडे, पं.स. सदस्य घाटबांधे, सरपंच प्रशांत माथुरकर तसेच देवरी, रेंगोलाचे सरपंच, इतर विभागाचे अधिकारी व गावकरी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Priority of public issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.