ग्रामविकासाच्या कामांना प्राधान्य द्या

By Admin | Updated: December 20, 2015 00:21 IST2015-12-20T00:21:57+5:302015-12-20T00:21:57+5:30

जिल्हयातील सर्व यंत्रणांनी ग्राम विकासाच्या कामास प्रथम प्राधान्य द्यावे.

Prioritize rural development works | ग्रामविकासाच्या कामांना प्राधान्य द्या

ग्रामविकासाच्या कामांना प्राधान्य द्या

नाना पटोले : जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती बैठक
भंडारा: जिल्हयातील सर्व यंत्रणांनी ग्राम विकासाच्या कामास प्रथम प्राधान्य द्यावे. जिल्हयाच्या विकासासाठी आलेला निधी गावातील सामान्य लोकांच्या सोयी सुविधांवर खर्च करा, तसेच कोणत्याही योजनेचा निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार नाना पटोले यांनी दिल्यात.
जिल्हा परिषद सभागृहात जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना खा. पटोले बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी धीरजकुमार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगर परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,मनरेगा, नरेगा, कृषि विषयक कामे, राष्ट्रीय एकात्मिक पाणलोट योजना, शिक्षण, आरोग्य, आदर्श सांसद ग्राम, ग्राम सडक योजना, जीवन प्राधिकरण, राष्ट्रिय पेयजल योजना, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, अंतर्गत मिळालेल्या कामांचा व निधीचा आढावा घेण्यात आला.
नरेगा अंतर्गत कामात सुसुत्रता आणून प्रत्येक मजूराला तात्काळ मजूरी मिळाली पाहिजे या दृष्टीने काम करा. एकात्मिक पाणलोट योजनेंतर्गत लेंडेझरी व लाखनी येथे प्रकल्पाचे काम चालू असून या योजनेअंतर्गत ग्रामस्थांना व्यक्तीगत लाभाच्या योजनेतून व्यवसाय व उत्पन्न मिळवून दिले पाहिजे, असे खा. पटोले म्हणाले.
कृषी विभागाच्या योजना चांगल्या प्रकारे राबविल्यास संपूर्ण गावाचा विकास होऊ शकतो. असेही ते म्हणाले. निर्मल भारत अभियानांतर्गत घरकूल व शौचालयाची कामे अतिक्रमण ही बाब धरुन मान्यता रोखू नये, जिल्ह्यात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असून ग्रामस्थांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी निर्धारित कोटा पूर्ण करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. संजय गांधी निराधार योजनेंचा लाभ गरीब जनतेला मिळाला पाहिजे. संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज लक्षात घेता वनराई बंधाऱ्यातून पाणी अडवा. तसेच लोकसभागातून या कामास गती दया, असे ते म्हणाले.
गर्रा बघेडा आदर्श ग्रामातील निराधाराचा प्रश्न निकाली काढावा, असा प्रश्न कलाम शेख यांनी उपस्थित केला. त्यावर खा. पटोले यांनी प्रकरणाविषयी तहसिलदार तुमसर यांना माहिती विचारली. तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी याबाबत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीला पंचायत समिती सभापती, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, शिक्षणाधिकारी शेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर, कार्यकारी अभियंता तहसिलदार, व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Prioritize rural development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.