प्राचार्य व शिक्षकांमधील वादात विद्यार्थ्यांचा बळी?

By Admin | Updated: May 2, 2015 00:46 IST2015-05-02T00:46:14+5:302015-05-02T00:46:14+5:30

जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांधचे प्राचार्य व येथील शिक्षकांच्या वादात विद्यार्थ्यांचा बळी दिला जात आहे.

Principal and teachers fight for the death of students? | प्राचार्य व शिक्षकांमधील वादात विद्यार्थ्यांचा बळी?

प्राचार्य व शिक्षकांमधील वादात विद्यार्थ्यांचा बळी?

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : नवोदय विद्यालयातील प्रकरण
अर्जुनी मोरगाव : जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांधचे प्राचार्य व येथील शिक्षकांच्या वादात विद्यार्थ्यांचा बळी दिला जात आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यालयातील गैरप्रकार उघडकीस येऊ नये, यासाठी काही विद्यार्थ्यांना टार्गेट बनविले जात असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, केशोरी येथील प्रणय गौतम तिरपुडे हा विद्यार्थी सत्र २०१४-१५ मध्ये नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने प्रवर्जन मायग्रेशन या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शालेय शिक्षण घेण्याकरिता जवाहर नवोदय विद्यालय फरीदाबाद येथून आलेला विद्यार्थी राहुल चव्हाण याला मारण्याची धमकी दिली. या कारणावरून त्याला २७ फेब्रुवारी रोजी निलंबित केले. त्याच दिवशी त्याला विद्यालयाच्या वाहनाने केशोरी येथे स्वगाावी पाठविले. त्यानंतर त्याला ३ मार्चच्या पत्रानुसार वर्ग अकरावी विज्ञानच्या परीक्षेला बसण्याची अनुमती दिली. मात्र परीक्षेसाठी घरुन जाणे-येणे करण्याची अनुमती दिली, त्याला विद्यालयात राहण्याची परवानगी दिली नाही. या विद्यार्थ्यांने केशोरी येथून नवेगावबांधला ये-जा करून परीक्षा दिली. अकरावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे १ एप्रिलपासून वर्ग सुरू झाले. मात्र या वर्गात बसण्याची परवानगी विद्यालयातर्फे देण्यात आली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. आपल्याला दिलेल्या या शिक्षेमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचले. त्याने या प्रकरणाची वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीचा सूड उगवण्यासाठी प्राचार्य त्या विद्यार्थ्याला १२ व्या वर्गात प्रवेश देत नसल्याचे समजते.
या प्रकरणाविषयी प्रस्तूत प्रतिनिधीने माहिती जाणून घेतली असता या विद्यालयातील एक शिक्षक या विद्यार्थ्याला उलटसुलट सांगतो. त्यांच्या सांगण्यावरून हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांचे नेतृत्व करीत असल्याचे सांगितले. प्राचार्य व शिक्षकांच्या या आंतरिक वादाचा हा विद्यार्थी बळी ठरत आहे. या विद्यालयात दोन शिक्षक हे प्राचार्यांचे अत्यंत नजीकचे आहेत. त्यांच्या सांगण्यावरुन या विद्यार्थ्याला विद्यार्थी सदनात राहण्यास मज्जाव केला जात आहे. यापैकी एक शिक्षक हा विद्यार्थी सदनात वास्तव्यास आल्यास नोकरी सोडून जाण्याची धमकी देतो. यावर प्राचार्य बलवीर हे त्या शिक्षकांच्या वक्तव्याने गुणमान करतता, मात्र त्या शिक्षकांना असे का बोलले म्हणून दमदाटी करीत नाही. या कारणामुळेच हे दोन शिक्षक प्राचार्यांनी केलेल्या कृतीच्या समर्थनार्थ या पद्धतीचे वक्तव्य करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
मायग्रेशनचे विद्यार्थी नेहमी आपसात भांडणे करीत असतात. हा प्रत्येक विद्यालयातील अनुभव असतो. मात्र त्यांची विद्यार्थ्याला एवढी मोठी शिक्षा देण्याचे प्रकार विरळच असतात. त्यामुळे हा विद्यार्थी दोघांच्या वादाचा बळी ठरत असल्याच्या चर्चा आहेत.
या विद्यालयातील कला विषयाचे शिक्षक चांदूरकर हे नागपूर, मराठी विषयाचे शिक्षक रामटेके हे भंडारा व वरिष्ठ शिक्षक लिल्हारे गोंदिया या स्वगावी प्रत्येक शनिवारला जातात व सोमवारला शालेय वेळेवर हजर होतात. मर्जीतल्या या शिक्षकांना प्राचार्यांकडून विशेष सवलत दिली जात आहे. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे. नियमानुसार हे निवासी विद्यालय आहे. येथे प्रत्येक शिक्षकांने निवासी असणे आवश्यक आहे. मग ही विशेष सवलत कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिक्षकांवर प्राचार्यांनी विद्यार्थी सदनाची जबाबदारी ही सवलत देण्यासाठी दिली नसल्याच्याही चर्चा आहेत.
विद्यालयाच्या या कारभारामुळे त्रस्त होवून काही विद्यार्थी विद्यालय सोडून इतरत्र बाहेर शिक्षण घेत आहेत. विद्यालय परिसरातील मोकळ्या जागेत तूर व इतर कडधान्याची शेती विद्यालयाच्या वतीने केली जाते. येथे विद्यालयात कार्य करणारे मजूर काम करतात. यावर्षी सुमारे दोन पोती तूरडाळीची विक्री करुन ते शासकीय खजिन्यात जमा करायला पाहिजे, मात्र त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे ऐकिवात आहे. विद्यालयाच्या परिसरात तूरदाळीची शेती हा एक नवेगावबांधच्या जवाहर नवोदय विद्यालयात अफलातून प्रकार दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे-बलवीर
प्रणय तिरपुडे या विद्यार्थ्याचे निलंबन प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. यावर ते अंतिम निर्णय घेतील. त्यानंतरच या विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा प्रश्न सुटेल. विद्यालयातील चांदूरकर, रामटेके व लिल्हारे हे शिक्षक शनिवारला स्वगावी जातात व सोमवारला शाळेत परततात. या प्रश्नावर शिक्षकांची लहान मुलं आहेत. रामटेके या शिक्षकाच्या मुलाचे वैद्यकीय कारण आहे. चांदूरकर हे विद्यार्थी सदनाचे शिक्षक आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत असोसिएट हाऊस मास्तर म्हणून झाडे हे काम पाहतात. नियमानुसार थांबणे हे गरजेचे आहे. मात्र वैद्यकीय समस्येचे अर्ज टाकून शिक्षक जातात. ते आपला कार्यभार सोपवून जाऊ शकतात. असे बलवीर यांनी सांगितले. विद्यालयात मी स्वखर्चाने तूर लावून मजुरीचा खर्च करतो. सर्वच कर्मचारी लावतात. चपराशी तर जंगलातील जागेत तूर लागवड करतात. विद्यालय परिसरात गवत वाढण्यापेक्षा तूरडाळ घेतो. प्रवर्जन मायग्रेशनच्या विद्यार्थ्यांशी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वादाची काही प्रकरणे आपल्या कार्यकाळात आली तरी आपण समुपदेशनाने ती सोडविली. यापूर्वी निलंबनाचे प्रकार घडले नाहीत, असे प्राचार्य बलवीर म्हणाले.

Web Title: Principal and teachers fight for the death of students?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.