प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:24 IST2017-05-23T00:24:12+5:302017-05-23T00:24:12+5:30

सिंचनाच्या कितीही सोयी असल्या तरी आपल्या भागातील शेतकरी निसर्गावर जास्त अवलंबून राहतो.

Prime Minister's Crop Insurance Scheme will be implemented effectively | प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबविणार

प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबविणार

नाना पटोले यांचे प्रतिपादन : मांदेड येथील नवनिर्मित ग्रा.पं.भवनाचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : सिंचनाच्या कितीही सोयी असल्या तरी आपल्या भागातील शेतकरी निसर्गावर जास्त अवलंबून राहतो. अशावेळी कधी जास्त तर कधी कमी पाऊस, रोगराई तसेच अन्य कारणाने निसर्ग कोपला तर शेतकरी धारातीर्थ कोसळतो, अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीच उभा राहत नाही. मात्र आता शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान जरी झाली तर त्यांना भरभरून मदत मिळाली पाहिजे, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर्षी जिल्ह्यात प्राभाविपणे राबविणार असून तशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील नवनिर्मित ग्रामपंचायत भवन तसेच डिजीटल वर्गखोलीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. जनसुविधा योजने अंतर्गत मांदेड येथे ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम करण्यात आले तसेच लोकवर्गणीतून येथील जिल्हा परिषद शाळेची एक वर्गखोली डिजीटल करण्यात आली. ग्रा.पं.भवन तसेच डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते आमदार राजेश काशिवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्या प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, गटनेते रामचंद्र राऊत,भाजपा तालुकाध्यक्ष नूतन कांबळे, खंडविकास अधिकारी देवरे, लाखांदूरच्या नगराध्यक्षा नीलम हुमणे,उपाध्यक्ष नरेश खरकाटे, नगरसेवक विनोद ठाकरे, रमेश मेहंदळे, हरीश बगमारे, प्रल्हाद देशमुख, बाजार समितीचे संचालक तेजराम दिवठे आदी उपस्थित होते.
खासदार पटोले म्हणाले, यापूर्वी रॅण्डम पद्धतीने पिक विम्याचा लाभ देण्यात येत होता. वीस पंचवीस गावाच्या रेव्हेन्यू सर्कलमध्ये पन्नास टक्केच्या वर नुकसान झाल्यास मदत जाहीर केल्या जात होती. मात्र आता गाव हा केंद्रबिंदू ठरला असून ३३ टक्के नुकसान झाली तरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाणार आहे. यासाठी पावसाळी हंगामासाठी दीड टक्के तर उन्हाळी हंगामासाठी दोन टक्के रक्कम भरावयाची आहे.मागील वर्षी शेतकऱ्यांनी पैसे भरले मात्र नुकसान होऊनही बँकांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. योजनांची माहिती अधिकाऱ्यांना बरोबर नव्हती.मात्र यावर्षी आपण स्वत: लक्ष घातले असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यासाठी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करणार आहे. देश स्वातंत्र झाला मात्र देशातील लोकांना पाहिजे ते देऊ शकलो नाहीत. मात्र आता देशाचे प्रधानमंत्री यांनी प्रत्येक गरजूना घर देण्याचे वचन दिले आहे. येत्या २०२२ पर्यंत प्रत्येकाच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यंदा लाखांदूर तालुक्याला ५७५ घरकुले मंजूर झाली आहेत. या योजनेच्या लाभासाठी जनतेनी ग्रामसभेत जाऊन आपल्या नाव नोंदणी करून घ्यावे असेही आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. आमदार बाळा काशिवार यांनी लोकवर्गणीतून डिजीटल वर्गखोली निर्माण करण्यात आली याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक करताना शिक्षणासोबतच सुसंस्कृतपणा जपली पाहिजे, आर्थिक सक्षम समाज निर्माण झाले पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी उपसरपंच शामराव लांडगे, अभिमन ठाकरे, अस्मिता दिवठे, मेघा भर्रे, आरती दिवठे, सुरेखा लांडगे, नेमा गोठे, किशोर मस्के, मुख्याध्यापक प्रदीप मेश्राम, माधव दिवठे, सदाशिव खेत्रे, डाकराम बुरडे, वैजनाथ दिवठे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Prime Minister's Crop Insurance Scheme will be implemented effectively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.