अध्यक्ष, सचिवावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 7, 2015 00:54 IST2015-08-07T00:54:30+5:302015-08-07T00:54:30+5:30
शहरातील बन्सीलाल लाहोटी नुतन महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकांची एकही जागा शिल्लक नसताना नोकरी देण्याच्या नावाखाली ...

अध्यक्ष, सचिवावर गुन्हा दाखल
अडीच कोटींनी गंडा : बंसीलाल लाहोटी शाळेच्या संचालकांचा प्रताप, २८ जणांची केली फसवणूक
भंडारा : शहरातील बन्सीलाल लाहोटी नुतन महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकांची एकही जागा शिल्लक नसताना नोकरी देण्याच्या नावाखाली संचालकांकडून २८ जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकी आला आहे. शाळेचे सचिव व अध्यक्ष यांनी २८ जणांची जवळपास अडीच कोटी रुपयांनी फसवणूक केली. रक्कम दिलेल्यांची आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे भंडारा येथे संचालकांविरुध्द तक्रार नोंदविली. परंतु इतर संचालकांविरुध्द गुन्हा दाखल न करता संस्थेचे अध्यक्ष मुकूंदराव वझलवार व सचिव रविंद्र भालेराव या दोघांवरच गुन्हा दाखल केला आहे.
बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकांची जागा रिकामी नसतांना संचालकानी जागा भरण्याच्या नावाखाली नोकरी देण्याचे आमीष दाखवून २८ उमेदारांकडून कोट्यवधी रुपये घेतले. काहीनी आपली शेतजमीन विकून तर काहीनी निवृत्तीनंतर बँकेत ठेवलेल्या रक्कमेतून पैसे दिले. २८ जणांकडून जवळपास २८ कोटी रुपये जमविण्यात आले. पैसे मागताना काम न झाल्यास पैसे व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले. काम न झाल्यामुळे अर्ध्या रक्कमेचे त्याना धनादेश देण्यात आले. बँकेत पैसे नसल्यामुळे धनादेश वटविल्या गेले नाही.
संचालकानी घेतलेली रक्कम शाळेच्या बांधकामावर खर्च केले तर काहींनी नातेवाईकांच्या विकासाकरिता खर्च केल्याचे समजते. या पैशाच्या देवाणघेवाणीवरुन संचालक मंडळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असल्याचे समजून येते. दिलीप कुलकर्णी, सुभाष सहादेव बडवाईक, अमरदास निमकर, एकनाथ हटवार, रामदास गभने आदींनी पोलीस ठाणे येथे संस्थेचे अध्यक्ष मुकुंद वझलवार, सचिव रवींद्र भालेराव, संचालक सुधीर गुप्ते, पी. बी. फुंडे, राधेश्याम लाहोटी, बी.पी. राठी, मनोज नळगे, एम.एल. भुरे, रामविलास सारडा यांचे विरोधात पोलीस स्टेशन भंडारा येथे तक्रार नोंदविली. पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष मुकूंद वझलवार व सचिव रवींद्र भालेराव यांचेवर गुन्हा दाखल केला. इतर संचालकांवर मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याचे सांंगितले जाते. तक्रारकर्त्यांनी भंडारा पोलीस ठाणे येथे १ जून ते ७ जून रोजी तक्रार दाखल केली. परंतु राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करुन पोलिसांची दिशाभूल करीत आहे. त्यांनतर २७ जुलैला पोलिसांनी अध्यक्ष व सचिव यांचेवर गुन्हा दाखल केले असल्याचे सांगितले. इतर संचालकावर सुध्दा गुन्हा दाखल करणे गरजेचे असतांना अद्यापपर्यंत त्यांचेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला गेला नाही. संस्थेचे सचिव हे विहिंपचे नेता असल्याचे सांगत असल्याने पोलीस त्यांना अटक करण्याची तत्परता दाखवित नाही. राजकीय दबावामुळे पोलीस त्यांना अटक करण्यास समोर येत नाही. पैसे देणारे हे बहुतांश सेवानिवृत्त आहेत. त्यांना सेवानिवृत्तीची मिळालेली रक्कम यांच्या आमिषाला बळी पडून देण्यात आली. आपली फसवणूक झाली असे लक्षात आल्यानंतर सचिवांचे जावई यांचा पुढाकाराने पैशाची मागणी केली.ओरिएण्टल ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरमचे अध्यक्ष यांच्या मार्फत मूळ रकमेच्या अर्ध्या रकमेचे धनादेश देण्यात आले. रविंद्र भालेराव यांनी २८ फसवणूक झालेल्या लोकांना धनादेश देण्यात आले. धनादेश बँकेत टाकले असता वटले नाहीत. संस्थेच्या संचालकावर गुन्हा दाखल करुन तत्काळ अटक करावी व घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केले आहे.