नगराध्यक्षपद आरक्षण लांबणीवर !

By Admin | Updated: June 10, 2016 00:29 IST2016-06-10T00:29:23+5:302016-06-10T00:29:23+5:30

जिल्ह्यातील तीन नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी मुंबईत काढले जाणारे आरक्षण लांबणीवर पडले आहे.

President postponed the postponement! | नगराध्यक्षपद आरक्षण लांबणीवर !

नगराध्यक्षपद आरक्षण लांबणीवर !

इच्छुकांचा हिरमोड : राजकीय मोर्चेबांधणी जोमात
भंडारा : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी मुंबईत काढले जाणारे आरक्षण लांबणीवर पडले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी बाशिंग बांधून तयार असलेल्या सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व पवनी या तीन नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील काही महिन्यात होऊ घातल्या आहे. यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे घोडेबाजाराला ‘ब्रेक’ लागणार आहे. नगराध्यक्षपद जनतेतून असल्याने त्यासाठी अनेकांची इच्छा जागृत झाली आहे.
नगराध्यक्षपदासाठी बुधवारी मुंबईत नगरविकास विभागात आरक्षणाची सोडत काढली जाणार होती. त्यामुळे सकाळपासूनच इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुंबईकडे नजरा लागल्या होत्या. मात्र तांत्रिक कारण समोर करून ऐनवेळी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत लांबणीवर टाकण्यात आली आहे. ती नेमकी केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट नसल्यामुळे अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
या पदासाठी सोडत न निघाल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला असला तरी त्यांची फिल्डींग मात्र कायम आहे. आरक्षण निश्चित झाले असते तर नगराध्यक्षपदाची निवडणूक कुणी लढवायची आणि कुणी नगरसेवकाची हेसुद्धा या इच्छुकांमधून स्पष्ट झाले असते. नगराध्यक्षपद डोळ्यापुढे ठेऊन इच्छुकांनी नगरपरिषद क्षेत्रात आपली तोंड ओळख निर्माण करणे सुरू केले आहे. कुणी अभिनंदन, शुभेच्छांचे आपले बॅनर लावून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहींनी वॉर्डावॉर्डाचा फेरफटका मारून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. भंडारा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून या पक्षात इच्छुकांची यादी मोठी आहे. भाजपात सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या मतानुसार नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे अनेकांनी लोकप्रतिनिधींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असून आम्ही तुमचेच निष्ठावान कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नगराध्यक्षपदाची उमेदवारी पदरी पाडून घेण्यसाठी काही पक्षात ‘डिलिंग’ची तयारी काहींनी ठेवली आहे. सोयीचे आरक्षण न निघाल्यास या इच्छुकांना नगरसेवकपदावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

भंडाऱ्यात आता ३३ नगरसेवक
भंडारा नगर परिषदेची निवडणूक जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होऊ घातली आहे. तत्पूर्वी नव्याने प्रभाग रचना होणार आहे. येथील नगर परिषदेत सध्या ३२ सदस्य आहेत. आता त्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार एका सदस्याची वाढ होणार आहे. त्यामुळे येथील नगरपरिषद सदस्य संख्या आता ३३ होणार आहे. राज्य शासनाने यावेळी एका प्रभागातून दोन सदस्य निवडून देण्यासंबंधी निर्णय घेतला आहे. त्यानुसार भंडाऱ्यात आता १५ प्रभागातून प्रत्येकी दोनप्रमाणे ३० आणि अधिक मतदारसंख्या लक्षात घेऊन एका मोठ्या प्रभागात तीन सदस्य असे ३३ सदस्य निवडून दिले जाणार आहे. एका सदस्याची भर पडणार असल्यामुळे सदस्यसंख्या विषम होणार आहे. त्यामुळे बहुमतासाठी आता १७ सदस्यांची गरज भासणार आहे.

Web Title: President postponed the postponement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.