रोजगार हमीच्या कामावर मजुरांची उपस्थिती घटली
By Admin | Updated: May 23, 2015 01:14 IST2015-05-23T01:14:43+5:302015-05-23T01:14:43+5:30
तुमसर तालुक्यातील अनेक गावात रोजगार हमी कामावर मजूरीची प्रत्यक्ष उपस्थिती कमी असून मस्टर (कागदावर) आकडा मात्र फूगला आहे.

रोजगार हमीच्या कामावर मजुरांची उपस्थिती घटली
तुमसर : तुमसर तालुक्यातील अनेक गावात रोजगार हमी कामावर मजूरीची प्रत्यक्ष उपस्थिती कमी असून मस्टर (कागदावर) आकडा मात्र फूगला आहे. अनेक गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व त्यांचे नातेवाईकांनी जॉब कार्ड तयार केला आहे. कामावर ते थातुरमातूर जातात, परंतु मस्टरवर नियमित नोंद होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. खंडविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे भरारी पथक येथे नावापुरतेच आहे.
रोजगार हमी अर्धे तुम्ही व अर्धे आम्ही याचा प्रत्यय तुमसर तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर दिसून येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. मजूरांच्या थेट खात्यात मजूरी जमा होत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसण्याचा दावा केला गेला, परंतु येथे त्यावरही मात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील मजूरांचे जॉब कार्ड तयार केले. रितसर कामाची मागणी प्रस्तावासहीत ग्रामपंचायतीने पाठविली. त्याला नियमानुसार मंजूरी मिळाली.
रोजगार हमीच्या कामाची वेळ सकाळी ९ ते १ व सायंकाळी ३ ते ५ आहे. कामानुसार दाम असा नियम आहे. प्रत्यक्ष जॉब कार्ड धारकांची संख्या जास्त आहे. परंतु प्रत्यक्ष कामावर मजूरांची उपस्थिती कमी दिसून येते. रोजगार सेवक या मजूरांचा लेखा जोखा ठेवतो. प्रत्येक मजूराला शासनाने १६० ते १८० रूपये ठरवून दिली आहे. परंतु कामानुसार दाम या तत्वानुसार प्रत्यक्ष मजुरी ११० ते १२० किंवा त्यापेक्षाही कमी मिळते. अनेक गावात ग्रामपंचायत पदाधिकारी रोजगार हमीच्या कामावर जात आहे, अशी माहिती आहे. परंतु थातुरमातूर एक दोन दिवस गेल्यानंतर ते जात नाही. तरी त्यांची नियमित मस्टरवर नोंद केली जात आहे. रोजगार सेवक गावातीलच असल्याने त्यांची अनुपस्थिती तो दर्शवू शकत नाही. वरिष्ठ अधिकारी शोध मोहिम राबविणार काय? हा मुख्य प्रश्न आहे.
रोजगार हमी कामावर खंडविकास अधिकारी तथा संबंधित कर्मचाऱ्यांचे भरारी पथक जाऊन चौकशी करते, परंतु येथे भरारी पथक काय करते असा प्रश्न उपस्थित होतो. केंद्र व राज्य शासन येथे थेट अनुदान देऊन रोजगार देण्याचा दावाही फोल ठरला आहे. अनेक ग्रामपंचायतीने मे महिन्यात कामाला सुरूवात केली. २०१४ ची मजूरी अनेक मजूरांना मिळाली नाही. (तालुका प्रतिनिधी)