रेडझोन गावांसाठी कृती आराखडा तयार करा
By Admin | Updated: August 3, 2014 23:09 IST2014-08-03T23:09:54+5:302014-08-03T23:09:54+5:30
नदी काठावरील गावांचे पुरामुळे दरवर्षी नुकसान होते. अशा रेडझोनमध्ये येणाऱ्या गावासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करावा. पावसाळ्यात धरणाचे

रेडझोन गावांसाठी कृती आराखडा तयार करा
आपत्ती निवारण समितीची सभा : पालकमंत्री राजेंद्र मुळक यांची सूचना
भंडारा : नदी काठावरील गावांचे पुरामुळे दरवर्षी नुकसान होते. अशा रेडझोनमध्ये येणाऱ्या गावासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करावा. पावसाळ्यात धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी महसूल विभागाला पूर्वसूचना द्याव्यात. जेणेकरुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा व खबरदारीचे उपाय करण्यास पुरेसा अवधि मिळेल. जिल्ह्यात कुठलीही आपत्ती आली तरी यंत्रणा तयार असावी. अशा पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ना.मुळक बोलत होते. यावेळी आमदार अनिल बावनकर, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक कैलास कणसे, विदर्भ जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल उपस्थित होते.
नुकसान भरपाई देण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोणते मामा तलाव फुटण्यासारखे आहेत याचा आढावा घेऊन त्याची तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, म्हणजे सिंदपुरी सारख्या घटना टाळता येतील, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
गोसीखुर्द पॅकेज वाटपासंदर्भात आतापर्यंत ७ हजार ७५७ खाते धारकांपैकी ६ हजार ७८३ खातेधारकांना १८८ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. काही खातेदारांच्या सातबारावर अनेक नातेवाईकांची नावे असल्याने त्यांचे संमती नसल्यामुळे ती रक्कम अद्याप वाटप करावयाची आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी दिली. तसेच गोसीखुर्द पॅकेज वाटप करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे वाटप करण्यासाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार अशी अनेक पदे रिक्त असल्याची माहिती दिली. पावसाचे दिवस असल्यामुळे महावितरण मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असेही पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महावितरणच्या सुरू असलेल्या कामाचाही आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विभाग प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)