Preparation for state-level sports in the final phase | राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देराज्यातील संघ होणार दाखल : भंडारा येथील स्पर्धेत ४८४ खेळाडूंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे आयोजन येथे ७ नोव्हेंबरपासून करण्यात येत असून या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेमध्ये राज्यभरातील ४८४ खेळाडू सहभागी होणार आहेत.
जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालयाच्यावतीने या स्पर्धेची तयारी केली जात आहे. मैदानाची आखणी, मंडप उभारणी तसेच राज्यभरातून येणाऱ्या खेळाडू, संघ व्यवस्थापक, कोच यांच्या निवासाची, भोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
७ ते ९ नोव्हेंबरपर्यत आयोजि या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेची तयारी करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. काही महिन्यापूर्वी मैदानाची दुरावस्था झाली होती. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळाडूंना खेळण्यासाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे खेळाडुंनी पाठ फिरविली होती. मात्र आता राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचे यजमान पद भंडारा जिल्ह्याला मिळाले. त्यानिमित्ताने येथील जिल्हा क्रीडा संकुलाचे भाग्य उजळून निघत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि प्रशासनाच्या वतीने या मैदानाच्या दुरूस्तीचे काम गत आठ दिवसापासून हाती घेण्यात आले आहे. सर्वप्रथम या मैदानावरील अडथडे दूर करण्यात आले. त्यानंतर या मैदानाच्या परिसरात लाल माती टाकून योग्यपद्धतीने दबाई करण्यात आली. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची चमू राबताना दिसत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा कमतरतेचा सामना करावा लागतो. मात्र या परिस्थतीत विविध क्रीडा संघटनांची मदत घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मैदानाच्या दुरूस्तीसाठी हातभार लावत असल्याचे चित्र गत काही दिवसांपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर दिसत आहे. राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील खेळाडू भंडारा शहरात दाखल होणार असून त्यांच्या निवासासह सोयी सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने केला जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Preparation for state-level sports in the final phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.